पनामा, 7 मे : टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या स्पेसएक्स या कंपनीने अंतराळात पाठवलेलं स्पेसएक्स क्रू ड्रॅगन कॅप्सुल (SpaceX Crew Dragon capsule) या अंतराळ यानाचं पृथ्वीवर यशस्वी लॅण्डिंग झालं आहे. चार अंतराळवीरांना घेऊन रविवारी रात्री पनामा शहराजवळील मेक्सिको खाडीत पहाटे तीन वाजताच्या दरम्यान हे यान उतरलं. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या सहकार्याने ही अंतराळ मोहीम राबवण्यात आली होती. गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच नासाचं कुठलंही अवकाश यान रात्रीच्या वेळी समुद्रात लॅण्ड झालं. त्यामुळेही हा क्षण महत्त्वाचा होता. हा स्पेसएक्स कंपनीने तयार केलेला रॉकेटचा प्रोटोटाइप आहे. या अंतराळवीरांच्या गटाला "क्रू-1" असं नाव दिलं होतं. इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधून 160 दिवसांनी परतलेल्या चार अंतराळवीरांनी (SpaceX Astronauts) गुरुवारी पृथ्वीच्या वातावरणात आणि समुद्राच्या स्प्लॅशडाउनमध्ये परतण्याचा अनुभव सांगितला.
अमेरिकेचे अंतराळवीर व्हिक्टर ग्लोव्हर (Victor Glover) यांनी त्यांच्या पृथ्वीच्या कक्षेत येतानाचा थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले, "एका क्षणाला तर मी स्वतःला फक्त एवढंच म्हणत होतो की दीर्घ श्वास घे. कारण मला खूप जड वाटत होतं. टीव्हीवरचं कार्टून आकाशातून खाली येताना त्याला जसा गुरुत्वाकर्षणाचा (Gravitational Force) अनुभव येतो आणि त्याचं तोंड दबलं जातं तसंच काहीसं मला वाटत होतं. "
ही अशी पहिलीच मोहीम होती ज्यामध्ये अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर नेण्यासाठी आणि तिथून परत आणण्यासाठी स्पेसएक्सचं अंतराळयान वापरण्यात आलं. अब्जाधीश एलॉन मस्क (Billionaire Elon Musk) यांच्या कंपनीने हे अंतराळयानाचा प्रोटोटाइप तयार केला आहे.
ही मोहीम खूपच वेगळी आणि आव्हानात्मक असेल, अशी माझी अपेक्षा होती. पण ही सगळी मोहिमच माझ्या अपेक्षेपेक्षा कमी थ्रिलिंग वाटली. पण एकूणच मोहिमेत मजा आली. ॲक्सलरेशनचा भार छातीवर पडल्यामुळे श्वास घेणंच कठीण झालं होतं, पण शेवटी पृथ्वीवर लॅण्ड होण्याचा अनुभव अद्वितीय होता, असंही व्हिक्टरने सांगितलं.
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अमेरिकी अंतराळवीरांना पाठवण्यासाठी नासाने (NASA) स्पेसएक्स कंपनीशी करार केला आहे. 2011 पासून काही कारणांमुळे नासाला अंतराळयान पाठवणं शक्य झालं नाही. त्यामुळे तेव्हापासून नासाला रशियाच्या सोयुझ या अंतराळयानावर अवलंबून रहावं लागत होतं. सोयुझ ही यानं जमिनीवर लॅण्ड होतात.
पाण्यात लॅण्डिंगच्या अनुभवासाठी आम्ही सगळेच उत्साहित होतो. कोणालाच याचा यापूर्वी अनुभव नसल्यामुळे आम्हाला हे कसं पार पडेल, याची काहीच कल्पना नव्हती. मात्र जमिनीवरील लॅण्डिंगपेक्षा पाण्यातील लॅण्डिंग अगदीच आरामात आणि अलगद झालं असं मला वाटलं. रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून (Soyuz Spacecraft) लॅण्ड करताना जेवढा वेळ पॅराशूटमध्ये घालवावा लागतो, त्यापेक्षा स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानामध्ये कमी वेळ लागतो. लवकरच स्पेसएक्सच्या या ड्रॅगन अंतराळयानातून अंतराळवीर नसलेले सामान्य नागरिक 'अंतराळ पर्यटक' म्हणून प्रवास करतील, असं अमेरिकन अंतराळवीर शॅनॉन वॉकर (Shannon Walker) म्हणाले.
अमेरिकेचे अंतराळवीर माईक हॉपकिन्स म्हणाले, ‘ सामान्य नागरिकांसाठी सेंट्रिफ्युज ट्रेनिंग नवं असलं तरीही ते फारसं वेगळं नाही. त्यामुळे हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तेही स्पेस टुरिस्ट म्हणून सहजपणे या यानातील प्रवास करू शकतील.’
जपानी अंतराळवीर सोईची नोगुची म्हणाले,‘या यानाचं लॅण्डिंग अगदी स्मूथ झालं. त्याचा आम्हाला अगदी थोडा परिणाम जाणवला आणि तोही स्प्लॅश डाउननंतर. आम्ही जेव्हा पाण्यात उतरलो तेव्हा आम्हाला लाटांची अनुभूती झाली. तो जबरदस्त अनुभव होता.’
या यशस्वी उपक्रमानंतर स्पेसएक्सचे मालक मस्क यांचं सामान्य नागरिकांना अतंराळात पर्यटक म्हणून पाठवायचं स्वप्न सत्यात उतरेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.