मुंबई, 6 मे : आयर्नमॅन, सुपरमॅन किंवा अन्य कोणत्याही काल्पनिक सुपरहिरोच्या सिनेमामध्ये आपण अशक्य वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी, घटना घडताना पाहतो. त्या त्या सिनेमाच्या लेखक/दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीला दाद देतो. पण अशा भन्नाट कल्पना सिनेमात नव्हे,तर वास्तव आयुष्यात सत्यात उतरवणारेही अनेक जण असतात. विज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे ते शक्य झालं आहे. माणसाचा कल्पक मेंदू आणि विज्ञानाची साथ यामुळे अशा गोष्टी सत्यात उतरत आहेत. ब्रिटिशांच्या रॉयल नेव्हीतल्या जवानांनी नुकतंच ज्या तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पाडलं, त्याचा व्हिडिओ पाहून आपल्याला आपण सिनेमा पाहत असल्याचाच भास होतो; पण तो सिनेमा नव्हे,तर खऱ्या आयुष्यातली गोष्ट आहे. समुद्रातल्या प्रवासादरम्यान सोबतच्या छोट्या नौकांमधून चालत्या लष्करी बोटीत 'उडून' येण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा जेटसूटची (Jetsuits)चाचणी घेण्यात आली.
ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज (Gravity Industries) या ब्रिटिश कंपनीने हे जेटसूट तयार केले आहेत. ब्रिटनच्या (UK) दक्षिण किनारी समुद्रात या जेटसूट्सची चाचणी अलीकडेच यशस्वीरीत्या पार पडली. त्या चाचणीवेळचे व्हिडिओ ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीजकडून यू-ट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
हा जेटसूट म्हणजे दोन्ही हातांवर हवेचं वेगाने उत्सर्जन करणाऱ्या पाइप्ससारखी यंत्रणा असून, पाठीवर एक सॅक आहे. हा जेटसूट परिधान केल्यावर वेगाने चाललेल्या छोट्या नौकेतला पायलट अगदी सहजपणे समुद्राच्या पृष्ठभागावर हवेत तरंगू लागतो. तसाच उडत उडत तो वेगाने चाललेल्या मोठ्या लष्करी बोटीच्या दिशेने जातो आणि अगदी अलगदपणे बोटीच्या डेकवर लँड होतो. त्यानंतर तो तितक्याच सहजपणे हातावरची ती यंत्रणा अगदी काही सेकंदांत काढून ठेवतो आणि नंतर छोट्या नौकेतल्या (Rib Boat) दुसऱ्या जवानाला बोटीवर घेण्यासाठी दोरीची शिडी टाकतो. हा सगळा पराक्रम आपल्यालात्या व्हिडिओत पाहायला मिळतो.
ही यंत्रणा नसताना अशा प्रकारे चालत्या बोटीत चढणं अवघड आणि वेळ खाऊ असतं. काही वेळा अत्यंत गरजेच्या परिस्थितीत हेलिकॉप्टरचीही मदत घ्यावी लागते; पण जेटसूटमुळे ती प्रक्रिया सुलभ होणार असून, वेळही वाचणार आहे. तसंच जेटसूटमुळे बोटीच्या कोणत्याही भागावर उतरणं शक्य होणार आहे.
ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज या कंपनीकडून या चाचणीआधी प्रशिक्षणाचीही बरीच सत्रं पार पडली. त्याचं व्हिडिओ फूटेजही कंपनीने प्रसिद्ध केलं आहे.
या चाचण्या तीन दिवसांपेक्षा अधिक काळ सुरू होत्या. त्यात ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य टेस्ट पायलट रिचर्ड ब्राउनिंग यांच्यासह कंपनीतले अन्य सदस्य आणि HMS तामर या रॉयल नेव्हीच्या (Royal Navy) समुद्रात टेहळणी करणाऱ्या बोटीवरचे 42 कमांडो सहभागी झाले होते. चाचणीदरम्यान अनेक वेळा जेटसूटच्या साह्याने उड्डाण करण्यात आलं. कंपनीकडून अनेक महिने यावर काम सुरू होतं.
नेदरलँड्सच्या सागरी विशेष कृती दलासोबतची चाचणीही ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज या कंपनीने नुकतीच पूर्ण केली. या एका जेटसूटची किंमत सुमारे 4 लाख 30 हजार डॉलर्स आहे. त्यामुळे हे जेटसूट्स घ्यायचं रॉयल नेव्हीने ठरवलं, तर त्यासाठी खूप मोठी तरतूद करावी लागणार आहे.
ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीज या कंपनीने याआधी ब्रिटनच्या ग्रेट नॉर्थ एअर अँब्युलन्स सेवेसोबतही (Air Ambulance) काम केलं होतं. हवाई बचाव मोहिमांमध्ये वैद्यकीय टीम तैनात करण्याचा तो प्रयोग होता. त्यामुळे अगदी 90 सेकंदांतही अत्यंत दुर्गम भागात पोहोचणं शक्य झालं होतं. हेलिकॉप्टरलाही सगळीकडे जाण्यात मर्यादा असतात; मात्र तिथे ही टीम पोहोचू शकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.