नवी दिल्ली, 9 मे : भारतात नोकरीच्या समस्यांबाबत सतत आवाज उठवला जात असतो. लोक नोकरी मिळवण्यासाठी कोणी कुठे सांगेल तिथे प्रयत्न करतात. अनेकदा कोणत्याही नकली फ्रॉड ठिकाणी लोक नोकरी मिळेल या आशेने पैसेही भरतात आणि मोठं नुकसान होतं. सध्या असंच एक लेटर व्हायरल होत असून यात भारताच्या मिशन रोजगार अंतर्गत लोकांना ग्राहक सेवा प्रतिनिधी पदासाठी नियुक्त केलं जाईल असा दावा केला जात आहे. सरकारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट PIB Fact Check द्वारे या बाबतची खरी माहिती समोर आणली आहे.
काय आहे लेटर -
या लेटरमध्ये सर्वात वर हेडरला मोठ्या शब्दात भारतीय मिशन रोजगार असं लिहिलेलं आहे. लेटर सरकारकडून जारी करण्यात आल्याचं भासवण्यात आलं आहे. योग्य उमेदवारांना भारत सरकारच्या मिशन रोजगार अंतर्गत ग्राहक सेवा प्रतिनिधी अर्थात LDC पदासाठी नियुक्त केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे. यासाठी 35 हजार रुपये वेतन दिलं जाईल असंही सांगण्यात आलं आहे. तसंच जेवण, PF, मेडिकल फॅसिलिटी, इन्शोरन्स, घर भाडं अशा सुविधाही दिल्या जातील असं सांगण्यात आलं आहे.
ही नोकरी मिळवण्यासाठी अर्जदाराला 1280 रुपये शुल्क भरावं लागेल असंही सांगण्यात आलं आहे. त्यानंतर हे पैसे परत केले जातील असंही सांगितलं गेलं आहे.
केंद्र सरकार की भारतीय मिशन रोजगार योजना के तहत उम्मीदवार द्वारा आवेदन शुल्क देने पर ग्राहक सेवा प्रतिनिधि के रूप में नियुक्त किए जाने का दावा किया जा रहा है#PIBFactCheck ➡️यह दावा फर्जी है ➡️@MSDESkillIndia द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है ➡️ऐसी ठगी से सावधान रहें pic.twitter.com/TqwCIWNpp3
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 7, 2022
परंतु सरकारने हे नोकरीचं पत्र पूर्णपणे फेक, खोटं असल्याचं सांगितलं आहे. लोकांनी अशा पत्रापासून सावध राहण्याचंही सांगण्यात आलं आहे. अशाप्रकारच्या खोट्या सापळ्यात अडकून मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे फसवणुकीपासून वाचण्यासाठी सावध राहण्याची गरज असल्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.
लोकांचा सरकारी योजनांवर विश्वास असतो. त्याचाच फायदा फ्रॉडस्टर्सकडून घेतला जातो. सरकारची योजना असल्याचं सांगून मेसेज व्हायरल केले जातात. आणि मेसेज खरा समजून अनेकजण फ्रॉडच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे कोणत्याही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या योजनांवर, स्कीमवर विश्वास ठेवू नका. कोणीही फोनवर, मेसेजवर किंवा फॉर्म भरुन पर्सनल किंवा बँकिंग डिटेल्स विचारल्यास ते देऊ नका.
काय आहे PIB?
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Financial fraud, Job alert, PIB