मेक्सिको, 11 जुलै : प्रत्येक सर्वसामान्य माणासाला अंतराळ सफरीचा (Space Tour) आनंद घेता येणं, हे एकेकाळी असणारं स्वप्न आता सत्यात उतरण्याचा काळ जवळ आलाय. जवळ म्हणजे किती जवळ? तर काही मिनिटांच्या अंतरावर. ब्रिटनमधील कोट्यधीश रिचर्ड ब्रॅन्सन (Richard Branson) यांनी पाहिलेलं सामान्यांसाठीच्या अंतराळ सफरीचं स्वप्न पूर्ण होत असून त्याची पहिली सफर करण्यासाठी रॉकेट आकाशात झेपावलं आहे. विशेष म्हणजे या टीममध्ये मूळच्या भारतीय सिरिशा बांदला (Sirisha Bandla) हिचाही सहभाग असून कल्पना चावलांनंतर (Kalpana Chawla) अंतराळात झेपावणारी ती पहिली महिला ठरणार आहे.
कसा असेल प्रवास?
व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक आणि कोट्यधीश रिचर्ड ब्रॅन्सन हे त्यांच्या कंपनीनं तयार केलेल्या रॉकेटतून अंतराळाच्या पहिल्या सफरीसाठी झेपावले आहेत. ही सफर यशस्वी पार पडली, तर कंपनीमार्फत कमर्शिअल अंतराळ सफरींना सुरुवात होणार असल्याची घोषणा ब्रॅन्सन यांनी केली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं रॉकेट अंतराळात झेपावलं असून व्हर्जिन ग्रुपच्या अधिकृत सोशल हँडलवरून याची घोषणा करण्यात आली आहे.
उड्डाणापूर्वीचे उद्गार
रॉकेटतून अंतराळात झेपावण्यापूर्वी ब्रॅन्सन यांनी त्यांच्या ‘मिशन स्टेटमेंट’चा पुनरुच्चार केला. तुमची आणि माझी मुलं आणि नातवंडं या सगळ्यांचं अंतराळ सफरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी चाललो आहे, असं ते म्हणाले. हा सोहळा पाहण्यासाठी टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनीदेखील हजेरी लावली होती. टेस्ला कंपनीदेखील अंतराळ व्यवहारांशी संबंधित क्षेत्रात असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाल्याचा मोठा आनंद वाटत असल्याचं मस्क यांनी म्हटलंय.
हे वाचा -भारतात अजूनही 5G नाही मात्र 'या' देशांमध्ये सुरू आहे 6G आणण्याची चढाओढ
भारतीय महिलाही रॉकेटत
रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासोबत रॉकेटत असणाऱ्या टीममध्ये मूळ भारतीय असणाऱ्या सिरिशा बांदला यांचाही समावेश आहे. रॉकेटतील 5 जणांच्या टीममधून अंतराळात झेपावणारी सिरीशा बांदला ही कल्पना चावलानंतरची दुसरी भारतीय महिला ठरली आहे. 34 वर्षांची सिरिशा ही एअरॉनॉटिकल इंजिनिअर आहे. हा प्रवास एकूण 2.5 तासांचा असून हे रॉकेट 90 ते 100 किलोमीटर वर जाणार आहे. न्यू मेक्सिकोमधील स्पेस पोर्टमधून हे रॉकेट झेपावलं असून त्याच्या परतीकडं आता सर्वांचे डोळे लागले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aeronautics, Space