मुंबई, 21 जानेवारी : चेहरा पाहून कोणी पैसे देत नाही, तर पैसा कमवण्यासाठी कष्ट करावे लागतात. तुम्हीही हे वेळोवेळी अनुभवलं असेल. पण तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र तुमचा चेहरा हा तुम्हाला करोडपती बनवू शकतो. तुम्ही जर एका कंपनीला त्यांनी बनवलेल्या रोबोसाठी तुमचा चेहरा जसा आहे, तशाच चेहऱ्याचं डिझाइन वापरण्यास परवानगी दिली, तर तुम्हाला तब्बल दोन लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास दीड कोटी रुपये मिळतील. अर्थात यासाठी तुमच्या चेहऱ्याची निवड होणं महत्त्वाचं आहे.
रोबोला तुमचा चेहरा देणं, थोडं विचित्र वाटेल. पण येत्या काळात ही काल्पनिक गोष्ट प्रत्यक्षात उतरणार आहे. न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असणारी ‘प्रोमोबोट’ ही रोबोटिक्स कंपनी तिच्या पुढील ह्यूमनॉइड रोबोसाठी मानवी चेहरा शोधतेय. पण हा चेहरा दयाळू दिसणारा आणि लोकांना आकर्षित करणारा असावा. 2023 पासून हॉटेल्स, शॉपिंग सेंटर्स आणि विमानतळांवर दिसणार्या ह्युमनॉइड रोबोसाठी हा चेहरा वापरला जाईल. हा एका प्रोजेक्टचा भाग असून कंपनी यासाठी मोठी रक्कम खर्च करतेय.
हेही वाचा : Artificial Light : प्रकाश प्रदूषणाचा वेग वाढतोय, वेळीच सावध व्हा, अन्यथा...
असा शोधला जातोय चेहरा
प्रोमोबोट ही कंपनी मानवासारखे दिसणारे रोबो तयार करण्यासाठी ओळखली जाते. सध्या ही कंपनी अशा चेहऱ्याच्या शोधात आहे, जो दिसायला दयाळू असेल. लोकांना अशा चेहऱ्याजवळ जाण्यास भीती वाटणार नाही. लोकांना तो चेहरा आपल्यातील एखाद्या सामान्य व्यक्तीचा वाटावा. हा चेहरा शोधण्यासाठी कंपनी प्रयत्न करतेय. साधारणपणे जगभरात वापरल्या जाणार्या सर्व रोबोच्या चेहऱ्यावर मानवी हावभाव दिसत नाहीत. त्यामुळेच मानव आणि रोबो यांच्यामध्ये थोडंफार साम्य असावं, यासाठी कंपनीला खर्या व्यक्तीच्या चेहऱ्याचं डिझाईन वापरायचं आहे. त्या बदल्यात कंपनीची करोडो रुपये खर्च करण्याची तयारी आहे.
कंपनी किती पैसे देणार?
एपीफिलाडेल्फिया रोबो मेकर मानवी चेहऱ्यांची नोंदणी करेल, आणि त्यांचा वापर ह्युमनॉइड रोबोचा चेहरा तयार करण्यासाठी करेल. ह्युमनॉइड रोबोसाठी वापरण्यात येणाऱ्या चेहऱ्याच्या डिझाईनसाठी तुमच्या चेहऱ्याची निवड व्हावी, यासाठी सर्वात प्रथम कंपनीच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर ज्या व्यक्तीच्या चेहऱ्याची निवड होईल, त्याला कंपनीकडून दीड कोटी रुपये दिले जातील.
दरम्यान, प्रोमोबोट कंपनी शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आणि इतर गर्दीच्या ठिकाणी सहाय्यक म्हणून रोबोची रचना आणि विकास करते. कंपनीचा उद्देश लोकांना ओळखीचा चेहरा असलेला ह्युमनॉइड रोबो देणं आहे. सध्या या कंपनीचे रोबो 43 देशांमध्ये वापरले जातात. या क्षेत्रात कंपनी नावाजलेली असून सातत्यानं ती वेगवेगळे प्रयोग करीत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Robot