मुंबई, 06 जानेवारी: सध्याच्या काळात फिटनेसला विशेष महत्त्व दिलं जात आहे. हृदयविकार, डायबेटीससारखे गंभीर आजार होऊ नयेत, यासाठी साहजिकच अनेकांचा व्यायामाकडे कल वाढला आहे. अनेक तरुण-तरुणी जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. व्यायामासाठी जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं असतात. ट्रेडमिल हे त्यापैकीच एक उपकरण होय. सध्या व्यायामाची उपकरणं उत्पादित करणारी पेलोटन इंटरअॅक्टिव्ह ही कंपनी जोरदार चर्चेत आहे. ट्रेडमिलमधल्या तांत्रिक त्रुटींची माहिती वेळेवर न दिल्याने या कंपनीला 154 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे. व्यायामाची उपकरणं तयार करणाऱ्या पेलोटन इंटरअॅक्टिव्ह या कंपनीला ट्रेडमिलमधल्या धोकादायक तांत्रिक दोषाबद्दल माहिती न देणं महागात पडलं आहे. ट्रेडमिलमधल्या तांत्रिक बिघाडाची माहिती न दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे काही जणांना यामुळे दुखापतही झाली आहे. या कंपनीला 154 कोटी रुपये अर्थात 19 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला असून, कंपनीने तो देण्याचं मान्य केलं आहे. हेही वाचा - भारतातही आहेत न्यूड बीचेस; जाणून घ्या कोणती आहे ‘ही’ ठिकाणं ट्रेडमिलमधल्या दोषांबद्दल माहिती असूनही पेलोटन इंटरअॅक्टिव्ह अमेरिकी ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोगाला तात्काळ सूचित करण्यात अपयशी ठरली. 5 मे 2021 रोजी पेलोटन इंटरअॅक्टिव्ह आणि आयोगाने संयु्क्तपणे ट्रेडमिल परत मागवण्याची घोषणा केली होती. दरम्यान, पेलोटन कंपनीने एक निवेदन जारी केलं होतं. त्यात म्हटलं होतं, की आम्ही आमच्या उत्पादनांच्या निरंतर वाढीसाठी, तसंच आमच्या ग्राहकांची सुरक्षा आणि कल्याणासाठी वचनबद्ध आहोत. ग्राहकांच्या सुरक्षिततेत सुधारणा करण्यासाठी आम्ही सीपीएससीला सहकार्य करण्यास तयार आहोत. आम्ही अजूनही सेफ्टी फीचर्स सुधारावेत यासाठी सीपीएससीकडून ट्रेड रिअर गार्ड मंजुरी मिळवण्याकरिता काम करत आहोत. अमेरिकी ग्राहक उत्पादन सुरक्षा आयोग अर्थात `सीपीएससी`ने दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने कंपनीवर लावलेल्या आरोपांपैकी पेलोटन इंटरअॅक्टिव्हने आयोगाला तातडीने या संदर्भात कळवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. ट्रेडमिलमधल्या त्रुटींमुळे ग्राहकांच्या जीवितास किंवा त्यांना गंभीर इजा होण्याचा धोका असतो. याशिवाय पेलोटनने ग्राहक उत्पादन सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून परत मागवलेल्या ट्रेडमिलचं वितरण केलं. डिसेंबर 2018 पासून 2019 पर्यंत घडलेल्या घटनांबद्दल युझर्सनी आयोगाला अहवाल दिला. या कालावधीत आयोगाला 150हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. ट्रेडमिलमधल्या त्रुटींमुळे फ्रॅक्चर, भाजणं, जखमा होणं अशा 13 प्रकारे इजा झाली. तसंच एका मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.