आजकाल एखादी वस्तू दुकानात किंवा मॉलमध्ये जाऊन घेण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करण्यास लोक पसंती देत आहेत. कोणतीही वस्तू लागली, की फोनमध्ये अॅपवर किंवा वेबसाइटवर जायचं आणि ऑर्डर करायची, अशी सवयच लोकांना लागली आहे. यामुळे ती वस्तू घरपोच मिळते. त्यातच लॉकडाउनमुळे (Lockdown) ऑनलाइन शॉपिंग करण्याच्या सवयीत वाढच झाली आहे.
बाहेर न पडता आपल्याला हवं ते घरपोच मिळतं; पण बऱ्याचदा असंही होतं, की आपण ऑर्डर केलेल्या वस्तूऐवजी भलतंच काही तरी आपल्याला मिळतं. काही वेळा ऑर्डर केलेली वस्तू खराब निघते. अनेक लोकांची ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक झाली आहे; पण आपली फसवणूक झाल्यास आपल्याला त्याची तक्रार करता येते. एखादी वस्तू गॅरंटी किंवा वॉरंटीच्या कालावधीत बंद पडली, खराब झाली तर आपण त्याबद्दल तक्रार करू शकतो. त्यानंतर ती वस्तू संबंधित रिटेलर दुरुस्त करून देतो, अथवा बदलून देतो. असं न झाल्यास तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता. नुकतीच ग्राहक मंत्रालयानं (Consumer Ministry) या संदर्भातली एक घटना शेअर केली आहे. ग्राहकाच्या तक्रारीनंतर त्याला त्याचे पैसे परत मिळाल्याच्या या घटनेबद्दलचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे.
हे ही वाचा-Explainer: Swiggy आणि Zomato वर रेस्टॉरंट नाखूश, वाचा नेमकी काय आहेत कारणं
ग्राहक मंत्रालयाने ट्विटरवर याबद्दल माहिती दिली. त्या ट्विटमधल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने एका ऑनलाइन रिटेलरकडून (Online Retailer) इन्व्हर्टर बॅटरी विकत घेतली होती. त्यासाठी 9 हजार रुपयांचं पेमेंट त्याने ऑनलाइन स्वरूपात केलं. त्यानंतर तो त्या बॅटरीची डिलीव्हरी येण्याची वाट पाहत होता; मात्र त्याला ती बॅटरी मिळाली नाही. त्यामुळे त्याने याबाबत विचारलं असता, त्याला बॅटरीची किंमत 2000 रुपये जास्त असल्याचं सांगण्यात आलं.
‘तुमच्याकडून आम्ही चुकून कमी पैसे घेतले आहेत. तुम्ही पूर्ण पैसे भरल्यानंतर ती बॅटरी तुम्हाला डिलिव्हर केली जाईल,’ असं उत्तर ग्राहकाला मिळालं. ग्राहकाने पैसे भरण्यास नकार देऊन ऑर्डर कॅन्सल करून पैसे परत देण्याची मागणी केली. त्यांची ऑर्डर कॅन्सल झाली; पण त्यांना रिफंड मिळालं नाही.
संबंधित कंपनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनशी (consumer helpline) जोडलेली नव्हती. त्यामुळे आउटलेटला ई-मेल पाठवण्यात आला. त्यात तक्रारीबद्दल सर्व माहिती देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही आउटलेटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आउटलेटला एक रिमाइंडर पाठवण्यात आला. या रिमाइंडरनंतर आउटलेटकडून उत्तर देण्यात आलं, की ग्राहकाला त्याने भरलेली संगळी रक्कम परत केली आहे. पैसे मिळाल्यानंतर ग्राहकाने कंझ्युमर हेल्पलाइनला फोन करून तक्रार सोडवली गेल्याची माहिती दिली.
तुम्हालाही तक्रार करायचीय? जाणून घ्या पद्धत
तुम्ही ग्राहक असाल तर जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक आयोग किंवा राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रार करू शकता. याशिवाय consumerhelpline.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन तक्रार करू शकता. तसंच 14404 आणि 1800-11-4000 या टोल फ्री नंबरवर फोन करूनही तुम्ही तक्रार दाखल करू शकता. 8130009809 या नंबरवर एसएमएस करूनदेखील ग्राहकाला तक्रार करता येते.एसएमएस मिळाल्यानंतर ग्राहकाला फोन येईल आणि तक्रारीबद्दल माहिती विचारली जाते. ग्राहकाच्या माहितीनंतर तक्रार दाखल करून घेतली जाते.
तुम्हीदेखील ऑनलाइन शॉपिंग करत असाल. त्यात तुमची कधी अशी फसवणूक झाल्यास तुम्ही वर दिलेल्या हेल्पलाइन नंबरवरून तक्रार करू शकता. केवळ ऑनलाइन शॉपिंगच नव्हे, तर कोणत्याही प्रकारच्या खरेदीमध्ये ग्राहकाची फसवणूक झाली, तर त्याला दाद मागता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Online fraud, Online shopping