पेट्रोलची किंमत वाढली तरी नो टेन्शन; ओंकारने तयार केली अनोखी Electric Activa

पेट्रोलची किंमत वाढली तरी नो टेन्शन; ओंकारने तयार केली अनोखी Electric Activa

ओंकारने तयार केलेली ॲक्टिव्हा चालू असतानाच एक बटण दाबल्यावर आपल्या इंधनाचा मोड बदलू शकते. या गाडीची बॅटरी एकदा चार्ज केली की ती 85 किलोमीटरपर्यंत प्रवास करते.

  • Share this:

वाढती महागाई, जगभरातलं प्रदूषण आणि गेल्या वर्षापासून सुरू असलेला कोरोना महामारीचा मार या सगळ्यामुळे आपलं जीवन पूर्णपणे बदलून गेलं आहे. हवामान बदलामुळे निर्सगात घडणारे भीषण बदल दिसू लागले आहेत. त्यामुळे पारंपरिक जैव इंधन पेट्रोल, डिझेल ऐवजी सौर उर्जा, इलेक्ट्रिक याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. पर्यावरण रक्षणाला आपण मदत करू शकलो तर बरं म्हणून लोकांनी इलेक्ट्रिक बाइक आणि कार वापरायला सुरुवात केली आहे असं दिसतं. पण ही वाहनं महाग आहेत, ती अधिक वेगाने धावत नाहीत आणि एकदा बॅटरी चार्ज केल्यावर ती फार अंतरापर्यत टिकत नाही. अशा काही अडचणींमुळे अजुनही सगळेच सर्रास इलेक्ट्रिक व्हेइकल विकत घेत नाहीत. भारतात 2019 आणि 2020 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत 129 टक्के वाढ झाली आहे. येत्या दशकात ही वाढ खूप मोठी असेल असा अभ्यासकांचा अंदाज आहे.

पनवेलच्या ओंकाळ थाळे या 31 वर्षांच्या तरुणाने मात्र सर्वांसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या ओंकारने छंद म्हणून अभ्यास करून त्याच्या घराच्या गॅरेजमध्ये होंडा ॲक्टिव्हा गाडीचं इलेक्ट्रिक ॲक्टिव्हामध्ये रूपांतर केलं आहे. ही गाडी पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्ही इंधनांवर चालते. हे मॉडेल यशस्वी करण्यासाठी प्रयोग करताना ओंकारचं दिवाळं निघायची वेळ आली होती पण अखेर त्यानी हे मॉडेल यशस्वीपणे तयार केलं. द बेटर इंडियाने (The Better India) याबाबतची बातमी दिली आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

ओंकारने तयार केलेली ॲक्टिव्हा चालू असतानाच एक बटण दाबल्यावर आपल्या इंधनाचा मोड बदलू शकते. या गाडीची बॅटरी एकदा चार्ज केली की ती 85 किलोमीटरपर्यंत प्रवास करते. सर्वाधिक 60 किलोमीटर प्रतितास या वेगाने ही गाडी धावते आणि आतापर्यंत ओंकारने या गाडीवर 9 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्णही केला आहे. आहे त्या ॲक्टिव्हा गाडीलाच इलेक्ट्रिक करण्यासाठी नव्या गाडीच्या तुलनेत 40 टक्के कमी खर्च येतो.

प्रतीक्षा आहेARAIच्या मान्यतेची

ओंकारने तयार केलेल्या इलेक्ट्रिक बाइकच्या मॉडेलला मान्यता देण्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्स असोसिएशन ऑफ इंडियाला (ARAI) अर्ज केला आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीकडेही (ICAT)मान्यतेसाठी अर्ज करण्यात आला आहे असं ओंकारनी द बेटर इंडियाला सांगितलं.

अशी सुचली कल्पना

ओंकार म्हणाला,‘मी पनवेलहून ठाण्याला नोकरीला जाताना मला रस्त्यावरच्या गर्दीचा, वाहनांच्या ट्रॅफिकचा त्रास होत होता. त्यात वेळ, इंधन वाया जात होतं. मी 2017 मध्ये माझी सॉफ्टवेअर कंपनी पनवेलमध्ये सुरू केली. आमचं प्रोजेक्ट रात्री काम करायचं असल्यामुळे मी दिवसभर या गाडीचे प्रयोग करायला सुरुवात केली. लहानपणापासून मला इलेक्ट्रिक खेळण्यांमधल्या मोटर काढून त्यांचं कार्य समजून घेण्याचा छंद आहे. त्यामुळे मी आता आहे त्याच गाड्या इलेक्ट्रिक कशा करता येतील यावर खूप विचार केला. पहिल्यांदा मी इलेक्ट्रिक मोटरचा सायकलवर प्रयोग केला. तीन यशस्वी प्रयोगांनंतर मी अलिबागचा मित्र सचिन काळेला माझी कल्पना सांगितली. सचिनचं वर्कशॉप आहे.

सचिननी ओंकारला हा प्रयोग ॲक्टिव्हा गाडीवर करायचा आग्रह केला. सचिन म्हणाला.‘ओंकारने या संशोधनासाठी खूप पैसे खर्च केले होते. मी पण काही वर्षांपूर्वी हे प्रयोग करून पाहिले होते पण यशस्वीपणे उत्पादन तयार करू शकलो नव्हतो. त्यामुळे मला त्याचे प्रयत्न वाया जाऊ द्यायचे नव्हते म्हणून त्याला सांगितलं की ज्यातून पैसे मिळू शकतील असं उत्पादन आपण तयार करूया.’ओंकारने 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात कल्याणमधून एक वापरलेली ॲक्टिव्हा खरेदी केली आणि त्यावर प्रयोग सुरू केले.

ओंकार म्हणाला,‘भारत हे टू व्हिलरचं जगातलं मोठं मार्केट आहे तरीही भारतीय लोक जुनी वाहन भंगारात न टाकता कसातरी त्याचा वापरचालूच ठेवतात. आपल्या या मानसिकतेचाच उपयोग करायचं मी ठरवलं. इलेक्ट्रिक वाहनं बनवणारे इतर देशांतून त्याचा पार्ट मागवतात आणि भारतात जोडून ती गाडी विकतात मला तसं करायचं नव्हतं. सर्वोत्तम इलेक्ट्रिक बाइक 1 लाख रुपयांपर्यंत जाते. पेट्रोलवर चालणारी बाइक 80 हजारांपर्यंत येते. त्यामुळे मला जुनी गाडी इलेक्ट्रिक करून 40 हजार रुपयांत द्यायची इच्छा होती.’

भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांचे पार्ट फारसे चांगले नसतात त्यामुळे मी मला हवे तसे पार्ट बनवण्यासाठी रिव्हर्स इंजिनिअरिंग पद्धतीने गाडीचा अभ्यास सुरू केला आणि नवे पार्ट डिझाइन केले. माझी सगळी बचत आणि आताच्या कंपनीचा नफा मी या प्रयोगासाठी वापरला. कोविडमध्ये घरातच काम करून वर्कशॉपचं 30 हजार भाडं वाचवलं. सध्याच्या गाडीला इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित करण्यासाठी मी 30 लाख रुपये खर्च केले आहेत. आताच्या गाडीतील 85 टक्के पार्ट भारतीय बनावटीचे आणि इतर आयात केलेत पण मला संपूर्ण भारतीय किट तयार करायचं आहे.असं ओंकारनी सांगितलं.

एक बटन दाबून मोड बदलतो

या गाडीत एक बटन दाबलं की पेट्रोलवरची गाडी इलेक्ट्रिकवर चालू लागते पुन्हा तेच बटन दाबलं की तिच गाडी पेट्रोलवर चालते. याबद्दल तो म्हणाला,‘इग्निशनमध्ये दिलेल्या बटणामुळे पेट्रोलचा वापर बंद करून गाडी इलेक्ट्रिक इंधन वापरू लागते. गाडीच्या मागच्या चाकाला 1500Wमोटर बसवली असून बूट स्पेसमध्ये एक 72 व्होल्टचं बॅटरी पॅक बसवलं आहे. जर गरज वाटली तर हे किट सहज काढून ठेवता येतं आणि आहे तशी गाडी चालवता येते. एका चार्जमध्ये शहरातली दिवसभराची कामं तुम्ही करू शकता.’

या किटमुळे गाडीचं वजन 30 किलोंनी वाढतं पण या वजनामुळे गाडीच्या परफॉरमन्सवर फक्त 1 टक्काच परिणाम होतो. या गाडीची बॅटरी फास्ट चार्जरने दीड तासात तर पारंपरिक चार्जरने 5 तासांत चार्ज होते.

ही हायब्रीड गाडी नाही

ही गाडी हायब्रीड नाही कारण हायब्रीडमध्ये इंधन बदललं तरीही एकाच इंजिनचा वापर गाडी चालवायला केला जातो पण मी तयार केलेल्या गाडीत एक तर गाडी इंजिनवर चालते नाहीतर ती इलेक्ट्रिक मोटरवर चालते.SMARTECHआणिAUTOBATया कंपन्यांच्या बॅटरी मी वापरल्याने त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी गाडीचा प्रोटोटाइप पाहून त्यात गुंतवणूक करायची तयारी दाखवली आहे, असंही तो म्हणाला.

जुलै 2020 मध्ये ऑटोबॅट कंपनीने त्याला 1 कोटी रुपयांचा निधी दिला.त्यानंतर ओंकारने पनवेलमध्ये 5 हजार स्क्वेअर फुटांचं वर्कशॉप उघडलं आणि त्यात 500 रेट्रोफिट किट तयार केली. ओंकार म्हणाला,‘आम्ही ऑटोबॅट इ-मोटो प्रा. लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे आणि स्मार्टटेक या ब्रँडच्या नावाने हे किट विकणार आहोत. कंपनीने पुणे, मुंबई, ठाणे, अलिबाग, कर्जत आणि लोणावळ्यात डिस्ट्रिब्युटर निश्चित केले आहेत. आम्ही एआरएआय आणि आयसीएटीकडे परवानगी मागितली आहे एआरएआयची परवानगी मे 2021 पर्यंत मिळू शकेल. हे किट लोक सध्याच्या गाडीलाच बसवू शकतील त्यामुळे त्यांचा खर्च वाचेल आणि लोक इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळू शकेल.’

आपण ओंकारशी या क्रमांकावर संपर्क करू शकता08048703285.

First published: April 7, 2021, 9:14 PM IST
Tags: Tech news

ताज्या बातम्या