नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : हिंदी (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते, राजकारणी, निर्माते आणि दिग्दर्शक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे कमल हसन (Kamal Hasan) आता आणखी एका आगळ्यावेगळ्या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. आता ते डिजिटल दुनियेत (Digital World) पाऊल ठेवत आहेत. Non-fungible token ते डिजिटल जगात प्रवेश करणार असून, मेटाव्हर्सच्या (Metaverse) जादुई दुनियेत प्रवेश करणारे ते पहिले भारतीय सेलिब्रिटी (First Indian Celebrity) आहेत. कमल हसन यांनी 7 नोव्हेंबर रोजी त्यांच्या 67व्या वाढदिवसादिवशी (Birthday) ही घोषणा केली. आपले डिजिटल टोकन (NFT) संग्रह दाखल करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि सनी लिओनी या कलाकारांच्या ग्रुपमध्ये ते सामील होतील.
हा नवीन उपक्रम राबवण्यासाठी आपण अत्यंत उत्साही असून, मेटाव्हर्स (Metaverse) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उदयोन्मुख डिजिटल आणि भौतिक जगाच्या एकत्रीकरणाबद्दल आपण उत्सुक असल्याचं कमल हसन यांनी या वेळी सांगितलं. ज्यांना ही टोकन्स खरेदी करायची किंवा त्यात गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ती उपलब्ध असतील, असंही त्यांनी नमूद केलं.
आपल्या 60 वर्षांच्या आयुष्याच्या प्रवासात जे अनेक चढ-उतार झाले आहेत त्याबाबत मेटाव्हर्सवर ते माहिती देणार आहेत. कमल हसन यांनी या उपक्रमासाठी फॅन्टिको (Fantico) या भारतीय परवानाधारक डिजिटल प्लॅटफॉर्मबरोबर भागीदारी केली आहे. हा प्लॅटफॉर्म त्यांचा डिजिटल अवतारदेखील दाखल करणार आहे. याशिवाय कमल हसन यांना गेमिंगच्या दुनियेतही विशेष स्थान दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी मेटाव्हर्सवर एक गेम दाखल करण्याची योजना फॅन्टिको कंपनीनं आखली आहे.
त्यामुळे आता कमल हसन या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चाहत्यांशी (Fans) संवाद साधणार आहेत. हा डिजिटल प्लॅटफॉर्म असल्याने जगभरात ही सुविधा उपलब्ध असेल. कमल हसन यांचे चाहते त्यांचा डिजिटल अवतार पाहू शकतील. तसेच डिजिटल टोकनच्या स्वरूपात स्मृतिचिन्हही (Souvenirs) खरेदी करू शकतील. कमल हसन यांना ते भेटूही शकतील. फॅन्टिको सर्वांत प्रथम कमल हसन यांचे एनएफटी कलेक्शन (NFT Collection) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.
फॅन्टिकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत बोलताना म्हणाले की, 'गेम-आधारित मेटाव्हर्सवर दाखल झाल्याचा आनंद होत आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिला उपक्रम आहे. कमल हसन यांच्यासारखे दिग्गज या प्लॅटफॉर्मवर आल्यानं याला प्रोत्साहन मिळेल आणि आणखी अनेक निर्माते यात सहभाग घेतील.'
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या कमल हसन यांचे आजही लाखो चाहते आहेत. त्यांच्या या नवीन उपक्रमाचे चाहत्यांनी भरभरून स्वागत केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kamal hassan, Tech news