नवी दिल्ली, 29 मे : जर तुमचीही कार असेल, आणि एखाद्या टोल प्लाझावरुन रोजचं जाणं-येणं असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल प्लाझाच्या नियमांमध्ये अपडेट करत, एक मोठा बदल केला आहे. हायवेवर प्रवास सुलभ करण्यासाठी सरकारने फेब्रुवारी 2021 पासून फास्टॅग (FASTag) सिस्टम अनिवार्य केली, जेणेकरुन टोल प्लाझावर टोल टॅक्स भरण्यासाठी गाड्यांच्या लांबच-लांब रांगा लागू नयेत.
काय आहे नवा नियम -
आता सरकारने टोल प्लाझावर टोल टॅक्स वसूल करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण नियम बनवला आहे. नव्या नियमांनुसार, जर टोल प्लाझावर तुमच्या वाहनाला 100 मीटरहून अधिक लांब ट्रॅफिक लागलं किंवा तुम्हाला टोल पेमेंट करताना 10 सेकंदहून अधिक वेळ वाट पाहावी लागली, तर तुमच्याकडून, तुमच्या वाहनासाठी टोल टॅक्स वसूल केला जाणार नाही. या दोन्ही परिस्थितीत तुमच्यासाठी टोल टॅक्स मोफत केला जाईल. टोल प्लाझावर गाड्यांच्या लांब रांगांमुळे ट्रॅफिकची परिस्थिती निर्माण होऊ नये, प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी सरकारने हा नियम केला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
असा होईल बदल -
हा नवा नियम लागू करण्यासाठी टोल कलेक्शन पॉईंटवर पिवळ्या रंगाची लाईन आखली जाईल. टोल वसूल करणाऱ्यांना असे आदेश दिले जातील, की जर गाड्यांची लाईन, टोल कलेक्शन पॉईंटवर आखलेल्या पिवळ्या लाईनच्या पुढे गेल्यास, वाहन चालकांकडून टोल टॅक्स घेतला जाणार नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानुसार, फास्टॅग अनिवार्य करण्यात आल्यानंतर टोल प्लाझावर टोल टॅक्स वसूल करण्याची प्रक्रिया अतिशय वेगवान झाली आहे. तसंच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, आता टोल प्लाझावर आता 96 टक्के वाहनं फास्टॅगनेच टॅक्स भरतात. तर देशातील काही टोल प्लाझावर हा आकडा 99 टक्क्यांपर्यंत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Toll news, Toll plaza