मुंबई, 23 ऑगस्ट : सध्याच्या काळात मोबाइल किंवा कम्प्युटरमधला डेटा चोरी होण्याचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. बऱ्याच अॅप्सच्या माध्यमातून किंवा इंटरनेट लिंकवर क्लिक केल्यामुळे फोनमधला डेटा हॅक होतो. जगभरातल्या लाखो व्यक्तींचे फोन्स या प्रकाराला बळी पडले आहेत. अशा प्रकारे डेटाची चोरी करणारी अॅप्स स्पायवेअर (Spyware in smartphone) म्हणून ओळखली जातात. कित्येक युझर्सना याबाबत काहीच माहिती नसते. शिवाय, कधी कधी वरकरणी ही अॅप्स (Spyware apps) वेगळीच वाटत असल्यामुळे कित्येक जण फसतात. त्यामुळे अशी अॅप्स वेळीच ओळखून फोनमधून काढून टाकणं गरजेचं ठरतं. यासाठीच काही टिप्स येथे देत आहोत.
टेकक्रंच (Tech Crunch) या कंपनीने याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. या वर्षी जून महिन्यात त्यांना एक कॅशे फाइल (Cache file) मिळाली होती. दी ट्रूथ स्पाय या अॅपच्या इंटर्नल नेटवर्कवरून ती डंप करण्यात आली होती. या कॅशे फाइलमध्ये लीक झालेल्या सर्व अँड्रॉइड डिव्हाइसेसची माहिती होती. या लिस्टमध्ये स्मार्टफोनचे आयएमईआय नंबर (IMEI Number) किंवा त्यांचा युनिक अॅडव्हर्टायझिंग आयडी (Ads ID) या माहितीचा समावेश आहे.
स्पाय अॅपच्या (Spy Apps network) नेटवर्कमध्ये कॉपी9 (Copy9), एमएक्स स्पाय (MxSpy), आय स्पायू (iSpyoo), सेकंड क्लोन (Second Clone), दि स्पाय अॅप (The Spy App), इक्झॅक्ट स्पाय (ExactSpy), गेस्ट स्पाय (Guest Spy) आणि फोन ट्रॅकर (FoneTracker) अशा स्पायवेअर्सचा समावेश आहे. या सर्वांची नावं वेगवेगळी असली तरी, ही सगळी अॅप्स एकाच सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चरशी कम्युनिकेट करतात. शिवाय, ही सर्व अॅप्स एकसारखंच काम करतात. तुमच्या फोनमधली लॉगिन क्रेडेन्शिअल्स, पासवर्ड, फोटो किंवा अन्य माहिती चोरण्याचं काम ही अॅप्स करतात.
फोनमधलं स्पायवेअर असं तपासा
फोनमध्ये असं एखादं अॅप (Detect Spyware in mobile) आहे की नाही हे तपासण्यासाठी टेकक्रंचने कॉम्प्रोमाइज्ड डेटाच्या मदतीने एक स्पायवेअर लूकअप टूल (Spyware lookup tool) तयार केलं आहे. याच्या मदतीने तुम्ही स्पायवेअर केवळ शोधण्याचं नाही, तर ते रिमूव्ह करण्याचंही काम करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वांत आधी एका सेफ डिव्हाइसची गरज भासेल. तुम्ही तुमचे कुटुंबीय किंवा मित्रांचा फोन किंवा तुमचा दुसरा फोन वा कम्प्युटर वापरू शकता. या डिव्हाईसमधून तुम्हाला https://techcrunch.com/pages/thetruthspy-investigation/ या लिंकवर जावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आयएमईआय आणि अॅड्स आयडी हे पर्याय दिसतील. तुमच्या फोनचा IMEI आयडी आणि Ads आयडी एंटर केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळतील.
तुमच्या फोनचा Ads ID बदललेला दिसल्यास स्मार्टफोनमध्ये स्पायवेअर इन्स्टॉल झाला असल्याचं सिद्ध होईल. अशा वेळी हे टूल तुम्हाला मदत करू शकणार नाही; मात्र लूकअप टूलवर मॅच आढळल्यास तुमचा फोन लीक झालेल्या लिस्टमध्ये आढळला आहे हे सिद्ध होईल. जास्त डेटा उपलब्ध नसल्यास ‘लाइकली मॅच’ असा निष्कर्ष निघेल. तसंच ‘नो मॅच’ असा रिझल्ट आल्यास तुमचं डिव्हाइस सुरक्षित आहे असं सिद्ध होईल.
अशा प्रकारे तुम्ही तुमचा मोबाइल सुरक्षित आहे की नाही हे तपासून वेळीच योग्य ती खबरदारी घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone