मुंबई, 16 सप्टेंबर : तंत्रज्ञान हे दिवसागणिक प्रगत होताना दिसतंय. क्षणभरात सगळ्या जगाची माहिती ही इंटरनेटमुळे मिळते. तंत्रज्ञानाच्या या क्रांतीत गुगलचा सहभाग मोठा आहे. गुगल (Google) आपल्या युजर्ससाठी सतत नवी फीचर्स लॉंच करत असतं. अर्थातच, जगभरात गुगलची लोकप्रियता ही प्रचंड आहे. गुगलने गुगल फोटोज या सुविधेअंतर्गत काही नवी फीचर्स अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सच्या सोयीसाठी आणली आहेत. तर जाणून घेऊयात याबद्दलची माहिती. गुगलच्या गुगल फोटोज (Google Photos) या फीचरमध्ये मेमरीजचं नवं फीचर मे महिन्यात उपलब्ध करून दिलं होतं. या नव्या फीचरमुळे युजर्सना आपले गतवर्षातील फोटो आणि काही अविस्मरणीय क्षणांची आठवण करून देण्याची सुविधा मिळते. जेणेकरून, युजर्स पुन्हा जुन्या आठवणींचा आनंद घेतील. या नव्या फीचरमध्ये भर म्हणून गुगल फोटोजच्या मेमरी फीचरशी निगडित नवा अपडेट युजर्सच्या सोयीसाठी उपलब्ध झाला आहे. या नव्या अपडेटमुळे केवळ जुने फोटोज नाहीतर जुन्या व्हिडिओतील काही क्षणचित्रंही (Video Snippets) युजर्सना दिसणार आहेत. गुगलने या अपडेटची माहिती देताना म्हटलंय की, या व्हिडिओ स्निपेटसच्या फीचरमुळे जुन्या व्हिडिओतील काही ठळक क्षणचित्रंही आपोआप एकत्र केली जातील. जेणेकरून, युजर्सना या क्षणचित्रांचा आनंद घेता येईल. इतकंच नाही तर, युजर्स स्वत:देखील कुठल्याही जुन्या व्हिडिओतील इच्छित स्निपेटस सिलेक्ट, ट्रिम आणि सेव्ह करू शकतील. यासोबतच या नव्या फीचरमध्ये फोटो किंवा व्हिडिओ झूम करून पाहण्याची सोय आहे. पण ही झूम फंक्शनॅलिटी ही सिनेमॅटिक फोटोज झूम करताना वापरल्या जाणार्या तंत्रापेक्षा वेगळी आहे. तसंच व्हिडिओ तयार झाल्यावर युजर्स त्यांच्या आवडीचं गाणं हे व्हिसलिंग म्युझिक म्हणून त्या कलाकृतीला बॅकग्राउंडला ठेऊ शकतील. गुगल फोटोज अॅपच्या नव्या अपडेटनुसार युजर्स सिनेमेटिक मेमरीच्या (Cinematic Memory) स्वरूपात एकापेक्षा अधिक फोटोज एकत्र करू शकतात. यासोबतच सिनेमॅटिक फोटोजमध्ये डायनॅमिक झूम आणि इन्स्ट्रुमेंटल म्युझिकसारख्या नव्या फीचर्सचाही लाभ घेऊ शकतील. इतकंच नाही तर कोलाज एडिटरद्वारे अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम वापरणार्या युजर्सना याचा लाभ होईल. तसंच या फीचरमुळे फोटोज ड्रॅग अँड ड्रॉप, एडिट अशा सुविधांचादेखील लाभ घेता येईल आणि सोबतच मित्रांसोबत ते शेअरही करता येतील. गुगल फोटोजमुळे युजर्सना मित्र, आप्तेष्टांसोबतच्या शेअर्ड मेमरीज कोणत्याही अँड्रॉइड डिव्हाईसद्वारे अॅपच्या साहाय्याने अॅक्सेस करता येईल. गुगलने याबाबत माहिती देताना सांगितल आहे की, ‘वेब आणि आयओएस युजर्ससाठीदेखील अशा स्वरूपाचे अपडेट्स लवकरच उपलब्ध होतील’. कुणालाही जुन्या, अविस्मरणीय क्षणांची आठवण ही भुरळ घालतेच. त्यामुळे युजर्स मोठया प्रमाणावर या फीचरचा लाभ घेतील यात शंका नाही. गुगलच्या या नव्या फीचरचं अर्थातच सगळीकडे कौतुक होताना दिसतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.