मुंबई, 13 जुलै : तंत्रज्ञानाच्या दुनियेत डिजिटली सुरक्षित (Digitally Secured) राहणं अत्यंत आव्हानात्मक आहे. मोबाइल हे साधन जेवढं आपल्या गरजेचं आहे तेवढंच ते हानिकारकही ठरू शकतं. म्हणून सोशल मीडिया, ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन पेमेंट, तसंच विविध ऑनलाइन अकाउंट्स (Online Accounts) यांच्यासारख्या गोष्टींचा वापर करताना आपली आर्थिक तसंच खासगी माहिती, फोटो, व्हिडिओजचा कुणीही दुरुपयोग करणार नाही, याची काळजी घेण्याचे सल्ले तज्ज्ञ देतात. तसाच सल्ला गुगल (Google) आणि अल्फाबेटचे (Alphabet) या कंपन्यांचे सीईओ (CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी बीबीसी (BBC) वृत्तवाहिनीने घेतलेल्या एका मुलाखतीत दिला आहे. लहान मुलांनी किती वेळ फोन वापरावा, आपण आपल्या सोशल साइट्सचा पासवर्ड किती वेळा बदलावा, तसंच ते स्वतः किती फोन वापरतात या सर्व गोष्टींबाबतीत त्यांनी मुलाखतीदरम्यान माहिती दिली आहे.
ते आपल्या मुलांना स्वतःच्या मर्यादा ठरवण्याचं स्वातंत्र्य देतात. लहान मुलांसाठी इंटरनेट, मोबाइलचे काही साइड इफेक्ट आहेत का, असं विचारल्यावर ते सांगतात, की लहानपणी आपल्यालाही टेक्नॉलॉजीबद्दल भीती दाखवली जात होती.
पासवर्डच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, की ते त्यांचा पासवर्ड सारखा सारखा बदलत नाहीत. त्यांनी ऑनलाइन अकाउंट्सच्या बाबतीत टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा (two-factor authentication) वापर करण्याचा सल्ला दिला आहे. याद्वारे आपण अनेक प्रकारे सुरक्षित राहू शकतो.
ते किती फोन वापरतात, असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, की ते वेगवेगळ्या कामांसाठी एका वेळी 20पेक्षा जास्त फोन वापरतात. ते फोन सारखे बदलत राहतात आणि त्यातून फोनच्या टेस्ट घेत राहतात, असंही त्यांनी सांगितलं.
Artificial intelligence बद्दल ते म्हणतात, की मानवाने बनवलेल्या तंत्रज्ञानांपैकी हे सर्वांत महत्त्वपूर्ण, क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे. वीज किंवा इंटरनेटच्या शोधाशी त्याची तुलना केली जाते; पण या इतर आविष्कारांपेक्षाही Artificial intelligence त्यांना महत्त्वपूर्ण वाटतो.
सुंदर पिचाई हे 2015 पासून गुगलचे सीईओ आणि 2019 पासून अल्फाबेट कंपनीचे सीईओ आहेत. ते अमेरिकेचे नागरिक असले, तरी ते जन्माने भारतीय आहेत. त्यांचा जन्म तामीळनाडूत मदुराई (Madurai) इथे झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Password, Sundar Pichai