नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या (Netflix) चाहत्यांना डिसेंबर महिन्यात एक खास संधी मिळणार आहे. अमेरिकन कंटेन्ट स्ट्रिमिंग कंपनी 5 आणि 6 डिसेंबर रोजी एका स्ट्रिमफेस्टचं (Netflix Stream Fest) आयोजन करणार आहे. त्यामुळे ज्या युजर्सकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नाही, अशा लोकांना या स्ट्रिमफेस्टद्वारे नेटफ्लिक्स कंटेन्ट फ्रीमध्ये ऍक्सेस करण्याची संधी मिळणार आहे. नेटफ्लिक्स या स्ट्रिमफेस्टद्वारे भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत नव्या ग्राहकांना जोडू इच्छित आहे. भारतात नेटफ्लिक्सचे अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, डिज्नी हॉटस्टार, Zee5, MX Player असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म प्रतिस्पर्धी आहेत. अशात आपले युजर बेस वाढवण्यासाठी कंपनी स्ट्रिमफेस्टचं आयोजन करत आहे. (वाचा - तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय?हॅकिंगची शक्यता; या वर्षातील बिनकामाचे 20 पासवर्ड ) नेटफ्लिक्स इंडियाच्या उपाध्यक्ष मोनिका शेरगिल यांनी सांगितलं की, 5 डिसेंबर रात्री 12 वाजल्यापासून 6 डिसेंबर रात्री 12 पर्यंत भारतातील ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स मोफत उपलब्ध असणार आहे. युजरकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नसल्यास युजर नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि पासवर्डसह नेटफ्लिक्सच्या वेबसाईट किंवा अॅपवरून साइनअप करू शकतात. कंटेन्ट स्ट्रिमिंगसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही.
(वाचा - आता फोनवर बोलणं महागणार;नव वर्षात टेरिफ प्लान वाढवायच्या तयारीत आहेत या कंपन्या )
या स्ट्रिमिंग फेस्टमध्ये एकदा रजिस्टर्ड केल्यानंतर स्मार्ट टीव्ही, गेमिंग कंसोल, अॅपल, अॅन्ड्रॉईड अॅप किंवा वेबवर नेटफ्लिक्सवरच्या सर्व गोष्टी पाहता येणार आहेत. स्ट्रिमफेस्ट सुविधेद्वारे स्टँडर्ड डेफिनेशन सिंगल स्ट्रिमिंगची सुविधा मिळणार आहे. देशातील लोकांना कंपनीच्या कंटेन्टकडे आकर्षित करणं हा या मागचा उद्देश आहे.