नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने गुरुवारी त्याच्या कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती. यामध्ये त्यानं संपत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं. जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत असलेल्या झुकेरबर्गकडे जवळपास 70 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. झुकेरबर्ग म्हणाला की, इतकी संपत्ती ठेवण्याचा अधिकार कोणालाही असू नये. कोणाकडे किती संपत्ती असावी याचा काही नियम नाही पण इतके पैसे स्वत:जवळ ठेवण्याचा अधिकार नसावा असं वाटत असल्याचं झुकेरबर्गने म्हटलं. कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतील चर्चा सार्वजनिक करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. द व्हर्जने त्यांची एका बैठकीतील चर्चेची माहिती लीक केल्यानंतर कंपनीने साप्ताहिक बैठकीतील प्रश्नोत्तरांची माहिती सार्वजनिक केली. यामध्ये झुकेरबर्ग यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार एलिझाबेथ वॉरेन यांच्या मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांना मोडीत काढण्याच्या वक्तव्याचा विरोध केला. झुकेरबर्ग त्याच्या संपत्तीमधील सर्वाधिक भाग दान देणार आहे. त्याने मुलीच्या जन्मानंतर याबाबत सांगितले होते. तसेच काही लोकांसाठी इतकं दानसुद्धा कमीच वाटतं असंही झुकेरबर्ग म्हणाला होता. दोनच दिवसांपूर्वी झुकेरबर्गचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये फेसबुकपेक्षा ट्विटर आणि इन्स्टाग्राम चांगले असल्याचं म्हटलं आहे. हा ऑडिओ द व्हर्जने पहिल्यांदा पोस्ट केला होता. कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत झुकेरबर्गने टिकटॉक भारतात चांगला चाललं असून इन्स्टाग्रामलाही मागं टाकल्याचं म्हटलं आहे. VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.