मुंबई, 6 डिसेंबर: उच्च दर्जाची सिक्युरिटी फीचर्स आणि अत्याधुनिक फीचर्समुळे अॅपल कंपनीच्या फोनला आणि इतर उपकरणांना जगभरात मागणी आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने iPhone 14 हा नवीन फोन लाँच केला आहे. या फोनला युझर्सचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आता कंपनीने iPhone 15च्या लाँचची तयारी केली आहे; मात्र त्यापूर्वीच कंपनी आपल्या एका प्रॉडक्टमुळे अडचणीत आली आहे. अॅपल एअर टॅग या डिव्हाइसच्या माध्यमातून एका व्यक्तीने आपल्या पूर्वीच्या प्रेयसीवर पाळत ठेवल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणातल्या महिलेनं कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अॅपल एअर टॅग हे डिव्हाइस सामान ट्रॅक करण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. अनेक युझर्स आपल्या पाळीव प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठीही त्याचा वापर करतात; पण या चांगल्या उपयोगासह या उपकरणाचा गैरवापरही खूप जास्त प्रमाणात होत आहे. अनेक युझर्स इतरांवर लक्ष ठेवण्यासाठीदेखील याचा वापर करत आहेत. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात एका महिलेवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं पाळत ठेवल्याचं निदर्शनास आलं आहे.
हेही वाचा: तुम्हीही फोनचं ब्ल्यूटूथ कायम ऑन ठेवता? मग असं राहा ब्लूबगिंगपासून सुरक्षित
पीडित महिलेनं सांगितलं, की तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या कारमध्ये अॅपल एअरटॅग लावला होता. याद्वारे तो तिचं लोकेशन ट्रॅक करता होता. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, हे लक्षात येताच या महिलेनं अॅपल कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये तिनं नमूद केलं आहे, की बॉयफ्रेंडच्या अत्याचारामुळे त्रस्त झाल्यानं तिला त्याच्यापासून सुटका हवी होती; पण अॅपल एअरटॅगमुळे त्याला सतत तिचं लोकेशन समजत होतं.
अॅपल एअरटॅगच्या माध्यमातून एक्सनं आपल्या पार्टनरला ट्रॅक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. आणखी एका महिलेनंही अशाच प्रकरणात कंपनीवर खटला दाखल केला आहे. या महिलेचा पूर्वीचा पती एअरटॅगद्वारे तिच्या हालचाली टिपत असे. त्यासाठी त्यानं महिलेच्या मुलाच्या बॅगेला एअरटॅग लावला होता.
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कंपनीनं सांगितलं होतं की, एअरटॅगच्या माध्यमातून बेकायदा ट्रॅकिंग टाळण्यासाठी काही अपडेट्स जारी केले जाणार आहेत. कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं होतं, की वैयक्तिक सामानाचा ट्रॅक ठेवण्यासाठी हे डिव्हाइस बनवण्यात आलं आहे. कोणत्याही व्यक्तीचा मागोवा घेण्यासाठी त्याचा वापर योग्य नाही. याबाबत कंपनी गांभीर्यानं विचार करत आहे. एखादा अज्ञात एअरटॅग व्यक्तीसोबत असेल तर युझरला अलर्ट केलं जाईल. टोन सीक्वेन्सच्या मदतीने युझर्स एअरटॅग शोधूही शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.