नवी दिल्ली, 8 डिसेंबर : कोरोनाचा ऑटो, वाहन उद्योगाला मोठा फटका बसला. सणासुदीच्या काळात मात्र आता ऑटो सेक्टर पुन्हा एकदा सावरत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सध्या वाहन उत्पादक कंपन्या सवलतींचा वर्षाव करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. होंडा (Honda) कार कंपनीनेही डिसेंबर महिन्यात आपल्या विविध कार्सवर 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.
31 डिसेंबरपर्यंत होंडा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या सवलतींचा लाभ मिळणार आहे. मोटोरॉईडसने (Motoroids) दिलेल्या माहितीनुसार, जॅझ (JAZZ), अमेझ (AMAZE), फिफ्थ जेन सिटी (CITY), डब्ल्यू आर व्ही (WR-V) आणि सिव्हिक (CIVIC) अशा काही निवडक मॉडेल्सवर या रोख रकमेची सूट, एक्स्चेंज ऑफर्स आणि इतर विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.
होंडा जॅझ (JAZZ) -
या कारचं नवीन सुधारित मॉडेल नुकतंच लाँच करण्यात आलं असून, त्याची किंमत 7.49 लाख रुपये आहे. त्यावर 40 हजार रुपये सवलत देण्यात आली आहे. यामध्ये 25 हजार रुपये रोख, तर 15 हजार रुपये एक्स्चेंज बोनस आहे.
होंडा अमेझ (AMAZE) -
होंडाची ही सध्या सर्वोत्कृष्ट विक्री होणारी कार आहे. यावर पाच वर्षांच्या वॉरंटीसह 10 हजार रुपये एक्स्चेंज बोनस देण्यात येत आहे. या कारच्या स्पेशल एडिशनवर 7 हजार रुपये रोख सवलत, तर 15 हजार रुपये एक्स्चेंज बोनस आहे. त्याशिवाय 4 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट आहे.
होंडा डब्ल्यू आर व्ही (WR-V) -
होंडाने अलीकडेच या कारचं फेसलिफ्ट मॉडेल लाँच केलं आहे. बीएस-6 साठी योग्य असं हे कारचं फेसलिफ्ट मॉडेल आहे. यावर 40 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यात 25 हजार रुपये रोख आणि 15 हजार रुपये एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे.
होंडा सिटी (5 जेन) Honda City (5th-gen) -
या मॉडेलवर 30 हजार रुपये एक्स्चेंज बोनस देण्यात आला आहे.
होंडा सिव्हिक (CIVIC) -
ही होंडाची सर्वांत महाग कार आहे. याच्या डिझेल मॉडेलवर 2.5 लाखांपर्यंत, तर पेट्रोल मॉडेलवर 1 लाखाची सवलत मिळणार आहे. त्याशिवाय 6 हजार रुपये लॉयल्टी बोनस आणि 10 हजार रुपये एक्स्चेंज बोनस मिळणार आहे.