कोरोना वॅक्सिनच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान; कॉल आल्यास आधार-OTP शेअर करू नका
केंद्र सरकारने कोविड-19 लसीकरणाच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांपासून सतर्क राहण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या नावाने आलेल्या कोणत्याही कॉलवर तुमचा आधार कार्ड आणि ओटीपी नंबर शेअर करू नका.
नवी दिल्ली, 25 जानेवारी : देशात 16 जानेवारीपासून कोरोना बचावासाठी लसीकरण अभियान सुरू झालं आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला वॅक्सिन देण्यात येत आहे. त्यानंतर वरिष्ठ नागरिकांना लस देण्यात येईल. यादरम्यान केंद्र सरकारने कोविड-19 लसीकरणाच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांपासून सतर्क राहण्याचं सांगितलं आहे.
पीआयबीने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून असल्याचा दावा काही लोकांकडून करण्यात येत आहे. फसवणूक करणारे, वरिष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी त्यांना कॉल करतात आणि आधार कार्ड, ओटीपीसारखी माहिती त्यांच्याकडून घेत आहेत. परंतु हा फसवणूकीचा प्रकार आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या नावाने आलेल्या कोणत्याही कॉलवर तुमचा आधार कार्ड आणि ओटीपी नंबर शेअर करू नका.
Some #Fraudsters claiming to be from Drug Authority of India are calling senior citizens to confirm their Aadhaar and OTP for #COVID19Vaccine allocation
कोरोनाविरोधातील लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू झालं आहे. हे जगातील सर्वात मोठं लसीकरण आहे. आतापर्यंत 15 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. शनिवारपर्यंत 15,37,190 लोकांना लस दिली गेली आहे. वरिष्ठ नागरिकांना लस कधी देण्यात येईल याबाबत सरकारने कोणतीही माहिती दिलेली नाही. Co-WIN वर लशीसाठी आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्टसारख्या कागदपत्रांची गरज असते.
दरम्यान, देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 14849 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 155 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1 कोटी 6 लाखहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण जवळपास 19 कोटी 17 लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.