नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : राष्ट्रीय महामार्गांवरून (Natioanl Highways) प्रवास करताना तुमच्या गाडीला फास्टॅग (FASTag) असणं गरजेचं आहे. फास्टॅग ही टोल भरण्याची इलेक्ट्रॉनिक, संपर्करहित यंत्रणा (Electronic Contactless System) आहे. देशभरातल्या सगळ्या टोल नाक्यांवर (Toll Plaza) सर्व वाहनांकडून फास्टॅग (FASTag) पद्धतीनेच टोल स्वीकारलं जातं आहे. FASTag बंधनकारक असल्याने त्याचा वापर आणि मागणी वाढली आहे, त्यामुळे फसवणुकीची शक्यता आहे. NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) आणि IHMCL (Indian Highways Management Company Limited) बनावट फास्टॅगबाबत सावध केलं आहे.
एनएचएआय किंवा आयएचएमसीएलच्या नावानं अगदी हुबेहुब असे बनावट फास्टॅग विकले जात आहेत. पण ते वैध नाहीत, त्यांचा काहीही फायदा होणार नाही, असा अलर्ट एनएचएआय आणि आयएचएमसीएलच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.
वैध फास्टॅग खरेदी करायचा असल्यास तो तुम्हाला फक्त IHMCL च्या अधिकृत वेबसाईटवरच मिळेल किंवा MyFASTag App मार्फत खरेदी करता येईल. याशिवाय काही बँक किंवा अधिकृत पीओएस एजंटकडूनही खरेदी करू शकता. या बँकांची यादी IHMCL ने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.
हे वाचा - FASTag असूनही 'या' कारणामुळे भरावा लागू शकतो दुप्पट टोल
फास्टॅगसंबंधी फसवुणकीची कोणतीही घटना समोर आली तर NHAI च्या 1033 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा किंवा etc.nodal@ihmcl.com वर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
फास्टॅगची किंमत किती आहे?
फास्टॅगची किंमत दोन गोष्टींवर ठरते. त्या दोन गोष्टी म्हणजे, तुमच्या वाहनाचा प्रकार आणि तुम्ही ज्या माध्यमातून खरेदी करताय ती बँक. कार, जीप, व्हॅन किंवा बस-ट्रक किंवा मालवाहतूक करणारं हलकं वाहन, बांधकामाची मशिन्स आदी वाहनप्रकारानुसार फास्टॅगची किंमत वेगवेगळी असते. तसंच, प्रत्येक बँकेने फास्टॅग देण्याचं शुल्क (Issuance Fees) आणि सिक्युरिटी डिपॉझिट्स (Security Deposits) याचे आपापले वेगळे नियम बनवले आहेत.
फास्टॅग रिचार्ज (Recharge) कसा करायचा?
फास्टॅग रिचार्ज करणं सोपं आहे. त्यासाठी दोन पर्याय आहेत. फास्टॅग ज्या बँकेकडून घेतला असेल, त्या बँकेचं फास्टॅग वॉलेट वापरणं हा पहिला पर्याय. हे वॉलेट इंटरनेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डस् किंवा यूपीआय आदी पर्यायांद्वारे रिचार्ज करता येतं; मात्र यात काही वेळा अडचणी येऊ शकतात.
हे वाचा - Smart Helmet आता वाचवणार तुमचे प्राण आणि करणार पेट्रोलचीही बचत
दुसरा पर्याय आहे पेटीएम किंवा फोनपे यांसारख्या मोबाइल वॉलेट अॅप्सचा. बँकेपेक्षा याद्वारे रिचार्ज करण्याचा अनुभव अधिक चांगला असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fastag