मुंबई, 02 फेब्रुवारी : आयफोन, मॅकबुक, आयपॅड, टीव्हीओएस आणि वॉचओएस आहेत त्यांना 'सिरी'विषयी चांगली माहिती आहे. अॅपल उत्पादनांमध्ये सिरी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फीचर आहे, जे माणसासारख्या आवाजात प्रतिसाद देतं. हे फीचर वापरण्यास अतिशय सोपं आहे. तुम्ही जे करायला सांगता तेच हे स्मार्ट फीचर करतं. प्रगतिशील विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीने आता एआयच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.
अॅपलने त्यांच्या डिव्हाइसेससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. अॅपल बुक्स अॅपमध्ये आता एआय नॅरेटर देण्यात आला आहे. याचा अर्थ तुम्ही आता केवळ वाचू शकणार नाही, तर ऑडिओबुकमधला कंटेंट ऐकूदेखील शकणार आहात. दरम्यान, अॅपलने हा नॅरेटर अशा प्रकारे डेव्हलप केला आहे की त्याचा आवाज अगदी माणसांसारखा असेल. सध्या, चॅटबॉटपासून रोबॉटिक्स आणि अगदी ऑडिओबुक्सपर्यंत विविध अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी एआयचा वापर केला जात आहे. अॅपलने नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर करून माणसाचासारखा आवाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे बुक केवळ वाचण्याचाच नाही तर ऐकण्याचाही उत्तम अनुभव मिळतो. मजकूर वाचताना योग्य ठिकाणी विराम आणि जोर दिला जातो. त्यामुळे ऑडिओबुक ऐकणं आनंददायी ठरतं.
हेही वाचा : आता तुम्ही कुणालाही शेअर करु शकत नाही नेटफ्लिक्सचा पासवर्ड?
ऑडिओ बुकसाठी एआय ठरू शकतो गेमचेंजर
ऑडिओ बुक तयार करणं हे खरं तर खूप कठीण काम असतं. याचा सेटअप करण्यासाठी केवळ खूप वेळ किंवा पैसा लागतो असं नाही, तर 400 पानांचं पुस्तक मनोरंजक पद्धतीने सादर करण्यासाठी बऱ्याच घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे सध्या केवळ लोकप्रिय पुस्तकं ऑडिओ बुक स्वरूपात उपलब्ध आहेत; पण ऑडिओ बुकसाठी एआय गेमचेंजर ठरू शकतो. यामुळे ऑडिओ बुक रूपातल्या पुस्तकांची संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. ऑडिओ बुकचं वैशिष्ट्य असलेल्या पुस्तकांची संख्या वाढवणं हे एआय पॉवर्ड ऑडिओ बुक्सचं उद्दिष्ट आहे. ज्यांना वाचनाची आवड आहे, पण बसून वाचायला वेळ मिळत नाही, तेसुद्धा आता मोठ्या संख्येने पुस्तकांचा आनंद घेऊ शकतात. वाक्य मनोरंजक बनवण्यासाठी एआय प्रोग्राम करून अॅपल त्याचा वापर करत आहे.
या कॅटेगरीत फीचर उपलब्ध
आतापर्यंत हे फीचर दोन भिन्न आवाज असलेल्या काल्पनिक आणि प्रणयावर आधारित पुस्तकांसाठी उपलब्ध होतं. या दरम्यान एआय निवेदक म्हणून महिलेचा आवाज मॅडिसने आणि पुरुषाचा आवाज जॅक्सनने दिला आहे. अॅपल आता नॉन-फिक्शन आणि सेल्फ डेव्हलपमेंट व्हॉइस नॅरेशनवरदेखील काम करत आहे. यात हेलेना हा महिलेचा आवाज तर मिशेल हा एका पुरुषाचा आवाज असे दोन पर्याय उपलब्ध असतील.
असा करा फीचरचा वापर
अॅपल डिव्हाइसवर अशी पुस्तकं सर्च करण्यासाठी तुम्हाला Books अॅपवर जाऊन ऑडिओ बुक सर्च करावं लागेल. तुम्हाला शीर्षकाखाली आणि तपशील पृष्ठावरच्या लेखकाच्या नावाखाली `नॅरेटेड बाय अॅपल बुक` असं वाक्य दिसलं तर तुम्हाला एआय नॅरेशनचा आनंद घेता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple