नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: एखादी सेवा किंवा वस्तू घरबसल्या पाहिजे असल्यास मोबाइलवरून त्या ऑर्डर करण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. तसंच आपण माहितीही ऑनलाइन शोधतो. परंतु, असं करणं मुंबईच्या एका 24 वर्षीय वकील तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. बिअरच्या दोन बाटल्यांची व्हॉट्सअॅपवर ऑर्डर देताना त्याच्या बँक खात्याची माहिती घेऊन तरुणाला 44,782 रुपयांचा गंडा घातला गेला आहे. तरुणाने ऑनलाइन घराजवळील लिकर शॉपची माहिती शोधली होती. त्यानंतर त्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘इंडिया टुडे’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सध्या प्रचंड वाढले आहेत. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक, अशा असंख्य लोकांना दरदिवशी गंडा घातला जात आहे. यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही शोधल्या जातात. ऑनलाइन कुठलीही माहिती घेणं किती महागात पडू शकतं हे तरुणाच्या उदाहरणावरून दिसतं. एका वृत्तानुसार, तरुणानं घरपोच बिअर मिळवण्यासाठी ऑनलाइन त्याच्या घराजवळील लिकर शॉपची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याला एक नंबर दिसला. त्यानं तो डायल केला, पण समोरून कोणीही फोन उचलत नव्हतं. काही वेळानंतर त्याला एक मेसेज आला. वाईन शॉप मालकाच्या नावाने तो नंबर दाखवत होता. व्हॉटस्अॅपवर ऑर्डर देण्यास सांगितलं गेलं. त्यानुसार वकिलानं एका बिअरची ऑर्डर दिली. परंतु, घरपोच बिअर पाहिजे असल्यास 360 रुपयांची दोन बिअरची ऑर्डर द्यावी लागेल व घरपोच डिलिव्हरीसाठी 30 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील, असंही सांगितलं गेलं. त्याचवेळी समोरील भामट्यानं तरुणाच्या व्हॉटस्अॅपवर क्युआर कोड पाठवला व पैसे ऑनलाइन भरण्याची विनंती केली. खात्री पटल्यानंतर भामट्याने 4,999 भरा आणि दोन बिअरचं ऑनलाइन बिल घ्या असं सांगितलं. खात्यातून पैसे कपात होणार नाहीत, अशी खात्री त्या भामट्याने तरुणाला दिली. पाठवलेला क्युआर कोड स्कॅन करताच तरुणाच्या खात्यातून 499 आणि 4,999 रुपये वजा झाले. त्यानंतर तरुणाने पैस परत करण्यास सांगितले. त्यानंतर भामट्याने दुसरा क्युआर कोड पाठवला. तो स्कॅन केल्यानंतर पुन्हा पैसे वजा झाले. असे वारंवार केल्यानं तरुणाच्या खात्यातून एकूण 44,782 रक्कम काढून त्याची फसवणूक करण्यात आली.
हेही वाचा - Whats app मध्ये कम्युनिटी फीचरची एंट्री, 32 युजर्ससोबत व्हिडिओ कॉलिंग, 1024 लोकांचा ग्रुप
गंडा घालून तरुणाचा नंबर केला ब्लॉक
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणाने सातत्यानं भामट्याच्या नंबरवर कॉल केला. पण समोरून कोणीही फोन उचलत नव्हतं. वारंवार फोन केल्यानंतर काही वेळाने तरुणाचा नंबरच भामट्याने ब्लॉक केला. तरुणाने जवळील पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
फसवणूक होत असतानाही कोड स्कॅनिंग
भामट्याने ऑनलाइन बिल काढण्यासाठी तरुणाला 4,999 रुपयांचा क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगितलं होतं. तरुणाने त्याचवेळी सावध होऊन तो कोड स्कॅन करायला नको होता. कुठलाही व्यापारी बिलासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोड स्कॅन करायला लावत नाही. पहिल्यांदा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नंतरही कोड स्कॅन केल्यानं तरुणाची मोठी फसवणूक झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online fraud, Viral