लंडन, 7 जून : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला लंडनच्या ओव्हलमध्ये सुरूवात झाली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर रोहितने टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनची घोषणा केली, पण या टीमवर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांच्यासह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. गावसकरांनी कॉमेंट्रीमध्येच रोहित शर्माच्या टीम सिलेक्शनबाबत नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांनी पिच पाहून फास्ट बॉलरना प्राधान्य द्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे प्लेयिंग इलेव्हनमध्ये फक्त एक स्पिनर म्हणून रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली. भारतीय टीमचा अनुभवी स्पिनर आर.अश्विनला बेंचवर बसवण्यात आलं आहे. अश्विन टेस्टमध्ये टीम इंडियाचा विकेट टेकर आहे, तसंच त्याने भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अश्विनच्या गैरहजेरीवर गावसकरांनी प्रश्न उपस्थित केले. काय म्हणाले गावसकर? ‘अश्विन टीममध्ये नसल्यामुळे मी हैराण आहे. त्याच्यामुळेच टीम इंडिया इथपर्यंत पोहोचली. या विकेटवर अश्विनमुळे फार नुकसान झालं नसतं. उमेश यादवऐवजी अश्विनला टीममध्ये संधी देता आली असती,’ असं गावसकर म्हणाले. गावसकर यांच्या या मताला हरभजन सिंग यानेही पाठिंबा दिला. फायनलमध्ये सुरूवातीच्या तीन विकेट घेतल्यानंतर भारतीय बॉलरना संघर्ष करावा लागला आहे. ट्रेविस हेडने शतक तर स्टीव्ह स्मिथने अर्धशतक केलं आहे. भारतीय बॉलर्सनी उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांना माघारी पाठवलं. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. भारताची टीम रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमेश यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.