ओव्हल, 08 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या दिवशी 327 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाला फक्त 3 विकेट घेतला आल्या. ऑस्ट्रेलियाची अवस्था एकवेळ 3 बाद 76 अशी होती. त्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी द्विशतकी भागिदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेलं. भारताने प्लेइंग इलेव्हन निवडण्यात चूक केल्याचं दिग्गजांनी म्हटलं आहे. सुनिल गावस्कर, सौरव गांगुली यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त केली तर रवि शास्त्री यांनी मोलाचा सल्ला दिला. सौरव गांगुलीने सामन्यानंतर बोलताना भारताच्या दोन चुका सांगितल्या. 76 धावात 3 विकेट घेऊन भारत चांगल्या स्थितीत होता. पण इथेच चूक केली. भारताने ट्रेविस हेडला सहज धावा करू दिल्या. त्याच्यावर दबाव टाकता आला नाही आणि हेच महागात पडलं. तर अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवणं ही दुसरी चूक असल्याचं गांगुलीने म्हटलं. WTC Final : रोहितच्या टीम सिलेक्शनवर गावसकर नाराज, लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये सांगितली मोठी चूक एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्या संघात अश्विन, हरभजन, अनिल कुंबळे यांसारखे फिरकीपटू असतील त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष नाही करू शकत. तुम्हाला गँबल घ्यावा लागेल. ज्या गोलंदाजाने 470 हून जास्त विकेट घेतल्यात त्याच्यासाठी संघात जागा बनवावी लागेल. फायनलमध्ये अश्विनची गरज होती. ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरमध्ये 4 डावखुरे फलंदाज आहेत. अश्विन या फलंदाजांवर दबाव टाकू शकला असता असंही सौरव गांगुलीने म्हटलं. दरम्यान, रवि शास्त्रींना अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेतल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले आता चूक झालीय ती झालीय. अश्विनला विसरा आणि पुढे चाला. दुसऱ्या दिवसाचे प्लॅनिंग करा. आता चार दिवसांचा सामना शिल्लक राहिलाय. कसोटीत पुनरागमनाची संधी असते फक्त प्रयत्न करायला हवा. सुनिल गावस्कर यांनी कमेंट्री करतानाच अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवल्यानं प्रश्न उपस्थित केला. अश्विनला बाहेर ठेवल्यानं धक्का बसला. भारतीय संघ त्याच्या जोरावरच इथंपर्यंत पोहोचलीय. या खेळपट्टीवर उमेश यादवच्या जागी अश्विनला संघात घेता आलं असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.