अहमदाबाद, 27 मे : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलआधी इशान किशनला दुखापत झाली आहे. यामुळे तो आय़पीएल २०२३ च्या क्वालिफायर २ मध्ये फलंदाजी करण्यासाठीही उतरला नाही. त्याच्या जागी नेहल वढेराला फलंदाजीला यावं लागलं. नेहल वढेरा सलामीला अपयशी ठरला. इशान किशनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी केएल राहुलच्या जागी संघात घेतलं होतं. शुक्रवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात इशान किशनला ख्रिस जॉर्डनच्या हाताचा कोपरा लागल्यानं दुखापत झाली. मुंबईच्या दोन खेळाडूंना गुजरात विरुद्धच्या सामन्यावेळी दुखापत झाली. यामध्ये इशान किशन आणि कॅमेरून ग्रीन यांचा समावेश आहे. कॅमेरून ग्रीनला हार्दिक पांड्याने टाकलेला चेंडू डाव्या हाताला लागला. यामुळे तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानावरून परतला. त्याने पुन्हा येऊन फलंदाजी केली. मात्र 30 धावाच करू शकला. तर दुसरीकडे इशान किशन दुखापतीमुळे सामन्यात पुन्हा खेळूच शकला नाही. दुखापतीबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पण त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. पर्पल कॅप विनर मग अनसोल्ड प्लेयर ते नेट बॉलर; गुजरातला जिंकवणाऱ्या मोहितची चढउतारानं भरलेली प्रेरणादायी कहाणी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 7 जूनपासून लंडनच्या ओव्हलवर सुरू होणार आहे. यासाठी भारताचे खेळाडू विराट कोहली, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर यांच्यासह इतर काही जण इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केलं असून तो भारताकडून एकदिवसीय आणि टी20 मध्ये खेळला आहे. त्याने अद्याप कसोटी पदार्पण केलेलं नाही. मात्र त्याची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील कामगिरी जबरदस्त आहे. त्याने 48 फर्स्ट क्लास क्रिकेटच्या सामन्यात 39 च्या सरासरीने 2 हजार 985 धावा केल्या आहेत. यात 6 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 273 धावा त्याने केल्यात. तर टी20मध्येही शतक झळकावलं आहे. आयपीएल 2023 मध्ये इशान किशनने 30 च्या सरासरीने 454 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 75 धावांची सर्वोत्तम खेळी केलीय. टी20 क्रिकेटमध्ये १६७ सामने आतापर्यंत त्याने खेळले असून यात 4 हजार 292 धावा केल्या आहेत. 3 शतके आणि 24 अर्धशतकेही केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.