गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक मारली. मुंबई इंडियन्सविरुद्ध शुभमन गिलचं शतक अन् मोहित शर्माचे पाच बळी याच्या जोरावर गुजरातने दणदणीत विजय मिळवला.
क्वालिफायर 2 सामन्यात मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडल्यानंतर मोहित शर्मा चर्चेत आला आहे. अहमदाबादमध्ये गोलंदाजांची धुलाई होत असताना त्याने 2.2 षटकात फक्त 10 धावा दिल्या.
मोहित शर्मा हा यंदाच्या हंगामात क्वालिफायर 2 सामन्यातल्या कामगिरीने सध्या चर्चेत आहे. पण याआधीही त्याने आयपीएल गाजवलं आहे. त्यानंतर एक वेळ अशीही आली की तो आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिला, एवढंच नाही तर गेल्या हंगामात त्याने गुजरातकडून नेट बॉलरची भूमिकाही पार पाडली.
वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने पुन्हा पुनरागमन केलंय. 2022च्या हंगामासाठी लिलाव झाला तेव्हा त्याला कोणत्याच संघाने घेतलं नव्हतं. त्यानंतर 2022 च्या हंगामात गुजरात टायटन्सच्या संघात तो नेट बॉलर म्हणून दिसला होता.
यंदा मोहित शर्माला गुजरातने संघात घेतला आणि हा त्यांचा निर्णय फायद्याचाही ठरलाय. मोहित शर्माने आतापर्यंत 13 डावात 24 विकेट घेतल्या असून पर्पल कॅपच्या शर्यतीत मोहम्मद शमी, राशिद खान यांच्यानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
मोहित शर्माने आय़पीएलमध्ये 2013 मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा त्याला गुजरात टायटन्सने संधी दिली. याआधी तो चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे.
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना मोहित शर्माने 2014 च्या हंगामात 16 सामन्यात 23 विकेट घेतल्या होत्या. त्या हंगामात सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता.