मुंबई, 05 मार्च : महिला प्रीमियर लीगला सुरुवात झाली असून दोन सामनेही झाले आहेत. या दोन सामन्यात अनेक विक्रम झालेत. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनशेच्या वर धावा केल्या. उद्घाटनाच्या सामन्यात मुंबईने तर दुसऱ्या सामन्यात दिल्लीने बाजी मारली. दिल्ली कॅपीटल्सने आरसीबीला ६० धावांनी पराभूत केलं. या सामन्यात फलंदाजांसह गोलंदाजांनीही मोठे योगदान दिले. दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाज तारा नॉरिसने ५ विकेट घेत विक्रमही नोंदवला आहे. WPLमध्ये पाच विकेट घेणारी ती पहिली गोलंदाज ठरलीय. तिने ४ षटकात २९ धावा देत आरसीबीच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडलं. महिला प्रीमीयर लीगच्या ट्विटर हँडलवरून तारा नॉरिसच्या या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. यात म्हटलं की, WPLमध्ये ५ विकेट घेणारी पहिली गोलंदाज अमेरिकेची तारा नॉरीस ठरलीय. WPL2023 : RCBच्या पदरी निराशाच, दिल्ली कॅपिटल्सचा दणदणीत विजय तारा ही अमेरिकेची वेगवान गोलंदाज आहे. अमेरिका हा असोसिएट देशांपैकी एक आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये अनेक असोसिएट देशांच्या खेळाडूंनी नाव दिलं होतं. मात्र फक्त ताराला महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्लीने खरेदी केलं. दिल्लीच्या संघात स्थान मिळाल्यानंतर तारासमोर कामगिरी उंचावण्याचं आव्हान होतं. पहिल्याच सामन्यात पाच फलंदाजांना बाद करून तिने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. असोसिएट देशांपैकी आयपीएल किंवा WPLमध्ये पाच विकेट घेणारी ती पहिलीच क्रिकेटर ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.