मुंबई, 05 मार्च : महिला प्रीमियर लीगमध्ये दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीवर दणदणीत विजय मिळवला. आयपीएलमध्ये आरसीबीला आजपर्यंत विजेतेपद मिळवता आलेलं नाही. तर आता WPLमध्ये आरसीबीच्या संघाला पहिल्या सामन्यात 60 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. WPLच्या सलग दुसऱ्या सामन्यात दोनशे पेक्षा जास्त धावा झाल्या. नाणेफेक जिंकून आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांना दिल्लीची सलामीची जोडी फोडण्यात अपयश आलं. अखेर हिथर नाइटने एकाच षटकात लॅनिंग आणि शफालीला बाद केलं. मात्र तोपर्यंत दिल्लीच्या १५ षटकात १६३ धावा झाल्या होत्या. दिल्लीने दिलेलं २२३ धावांचे आव्हान पार करताना आरसीबीचा संघ 163 धावांपर्यंतच मजल मारू शकला. टीम इंडियात पदार्पणाची मिळाली नाही संधी, WPLच्या पहिल्याच सामन्यात केली धमाल आरसीबीच्या संघाची सुरुवात चांगली झाली होती. पण सोफी डिवाइन ११ चेंडूत १४ धावा काढून बाद झाली. एलिस कॅप्सीने तिला बाद केलं. त्यानंतर कर्णधार स्मृती मानधनासुद्धा एलिस कॅपसीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. तिने २३ चेंडूत ३५ धावा केल्या. यामुळे आरसीबीची अवस्था २ बाद ५६ अशी झाली. तर एलिस पेरी १९ चेंडूत ३१ धावा काढून तंबूत परतली. त्यानंतर आरसीबीच्या संघावर दबाव वाढत गेला. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर २० षटकात २ बाद २२३ धावा केल्या. कर्णधार मेग लॅनिंगने ४३ चेंडूत ७२ तर शफाली वर्माने ४५ चेंडूत ८४ धावांची खेळी केली. दोघीही एकाच षटकात हिथर नाइटच्या गोलंदाजीवर बाद झाल्या. त्यानतंर मारिझेन कॅप आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनीही फटकेबाजी केली. कॅपने १७ चेंडूत ३९ धावा काढताना ३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर जेमिमाहने १५ चेंडूत ३ चौकारांसह २२ धावा काढल्या. कॅप आणि जेमिमाहने अर्धशतकी भागिदारी केली आणि दोघीही नाबाद राहिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.