मुंबई, 18 मार्च : महिला प्रीमियर लीगमध्ये आज मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात रोमांचक सामना पारपडला. या सामन्यात आरसीबी संघाने गुजरातवर 8 विकेट्सने विजय मिळवला असून यात आरसीबीच्या सोफी डिवाईनची वादळी खेळी अतिशय महत्वपूर्ण ठरली. यासह आरसीबीने महिला आयपीएल मधील आपला दुसरा सामना जिंकला.
आरसीबी विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात पारपडलेल्या महिला आयपीएलमधील 16 व्या सामन्यात प्रथम गुजरातचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. गुजरातच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करून 20 षटकात 4 विकेट्स गमावून 188 धावांचा डोंगर उभा केला. यात गुजरात संघातील लॉरा वोल्वार्ड हिने 42 धावांमध्ये 68 धावांची जबरदस्त खेळी केली. तसेच आरसीबी समोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान ठेवले.
गुजरातने दिलेले 189 धावांचा डोंगर सर करण्यासाठी कर्णधार स्मृती आणि मानधना सोफी डिवाईन या दोघी मैदानात उतरल्या. यावेळी 31 चेंडूंमध्ये 37 धावांची खेळी करून 10 व्या षटकात स्मृती मानधनाची विकेट पडली. परंतु त्यानंतर सोफी डिवाईनने एकाएकी खिंड लढवत 36 चेंडूत 99 धावांपर्यंत मजल मारली तर 20 धावात तिने आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु शतकासाठी अवघी एक धाव शिल्लक असताना गुजरातची गोलंदाज किम गर्थने तिची विकेट काढली. परंतु सोफीच्या वादळी खेळीने आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. त्यानंतर एलिस पेरी आणि हेदर कनाइटने उर्वरित धावा करून आरसीबीला विजय मिळवून दिला.
विजयासह आरसीबीचा संघ सलग दुसऱ्या सामन्यात विजयी ठरला. यामुळे महिला आयपीएलच्या प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी आता आरसीबी संघाला केवळ एका सामन्यात विजय मिळवणं महत्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, RCB, Smriti Mandhana, WPL 2023