मुंबई, 15 मार्च : महिला प्रीमियर लीगच्या 13 व्या सामन्यात आज स्मृती मानधनाच्या आरसीबी संघाने दमदार कमबॅक केलं आहे. यूपी वॉरियर्स विरुद्धचा सामना आरसीबीने 6 विकेट्सने जिंकून महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना जिंकला. या विजयासह महिला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आरसीबीच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या आहेत. डी वाय पाटील स्टेडियमवर आज यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना पारपडला. सामन्याच्या सुरुवातीला आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरुवातीला यूपी संघाची सुरुवात फारच खराब झाली. आरसीबीच्या गोलंदाजांनी एकामागोमाग एक यूपीच्या 5 फलंदाजांना तंबूत धाडले. त्यानंतर यूपी वॉरिअर्सच्या संघाने धाव संख्या कशीबशी 100 पार नेली. अखेर 19.3 षटकात आरसीबीने यूपी संघाला 135 धावांवर ऑल आउट केले.
विजयासाठी १३६ धावांच सोपं आव्हान आरसीबीकडे होत. आरसीबीने 18 षटकात 5 विकेट्स गमावत 136 धावा करून विजय मिळवला. या सोबतच आरसीबीने महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना जिंकून पॉईंट टेबलवर आपले खाते उघडले आहे. यापूर्वी आरसीबीचा स्पर्धेच्या पाचही सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर आरसीबीला प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी यापुढील उर्वरित सर्व सामने जिंकणं गरजेचं होत. अशास्थितीत आरसीबीने स्पर्धेतील आपला 6 वा सामना जिंकून स्पर्धेतील आपलं आव्हान अबाधित ठेवलं.