मुंबई, 24 मार्च : भारतात सुरु असलेल्या महिला प्रेमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 72 धावांनी यूपी वॉरियर्सवर विजय मिळवला असून यासोबतच त्यांनी थेट महिला आयपीएलच्या फायनलमध्ये धडक दिली आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर मुंबई विरुद्ध यूपी वॉरियर्स या संघात महिला प्रीमियर लीगचा सेमी फायनल सामना पारपडला . या सामन्यात सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी यूपी वॉरियर्सने मुंबईच्या संघाला 20 षटकात 4 विकेट्स घेऊन 182 धावांवर रोखले. यावेळी मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 14, यस्तिका भाटिया हिने 21 तर नॅट सायव्हर-ब्रंट हिने सर्वाधिक 72 धावा करून संघासाठी मोलाचे योगदान दिले. यासोबतच मुंबईने यूपी वॉरियर्सला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले होते. WPL 2023 : महिला आयपीएलचा विजेता संघ होणार मालामाल! जाणून घ्या WPL च्या विजेत्यांना किती मिळणार Prize Money? मुंबईने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना यूपीच्या संघाची सुरुवात खराबी झाली. मुंबईच्या घातक गोलंदाजी समोर यूपीच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. मुंबईच्या इस्सी वॉंगने लागोपाठ 3 विकेट्स घेऊन महिला आयपीएलमध्ये पहिल्यांदा सलग 3 विकेट घेण्याची हॅट्रिक केली. तिने या सामन्यात एकूण 4 विकेट घेतल्या. तर सायका इशाक हिने 2 , हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट आणि जिंतीमणी कलिताने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. मुंबईने यूपीच्या संघाला 18 व्या षटकात 110 धावांवर ऑल आऊट केले.
मुंबईच्या संघाने यूपी विरुद्धचा सामना जिंकून थेट फायनलमध्ये धडक दिली आहे. आता 26 मार्च रोजी मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात फायनलचा सामना रंगणार असून यापैकी कोणता संघ महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनच विजेतेपद पटकावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.