केपटाऊन, 26 फेब्रुवारी : आयसीसी महिला टी२० वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर १९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह त्यांनी विजेतेपदाची हॅट्ट्रिक करत सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाची सलामीची बॅटर बेथ मूनीने नाबाद अर्धशतक झळकावलं. तिने सेमीफायनलमध्येही अर्धशतक केलं होतं. आता अंतिम सामन्यात तिने ५३ चेंडूत ९ चौकार आणि १ चौकारासह नाबाद ७४ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या. बेथ मूनीने अंतिम सामन्यात अर्धशतक करताना मोठा विक्रमही नावावर केला. महिला टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दोन वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारी ती पहिली क्रिकेटर बनली. मूनीने महिला टी२० वर्ल्ड कप २०२० च्या अंतिम सामन्यातही अर्धशतक केलं होतं. ऑस्ट्रेलियाचा सामना तेव्हा भारताशी झाला होता. मूनीने भारताविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ५४ चेंडूत नाबाद ७८ धावा केल्या होत्या. Womens T20 WC : ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदाचा षटकार, दक्षिण आफ्रिकेचा पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात एलिसा हिलीसोबत तिने ३६ धावांची भागिदारी केली. त्यानतंर एश्ले गार्डनरसोबत ४६ धावांची भागिदारी केली. तर पाचव्या विकेटसाठी एलिस पेरीसोबत ३३ धावांची भागिदारी केली. ग्रेस हॅरीस आणि कॅप्टन मेग लॅनिंग यांना फारशी कमाल करता आली नाही. दोघीही प्रत्येकी दहा धावा काढून बाद झाल्या. ऑस्ट्रेलियाने बेथ मूनीच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डटच्या अर्धशतकी खेळी केली. मात्र तिची झुंज अपुरी ठरली. आफ्रिकेला १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.