धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 13 फेब्रुवारी : क्रिकेट वेड्या भारतामध्ये महिलांच्या क्रिकेटची फारशी चर्चा होत नसे. ही परिस्थिती गेल्या काही दिवसांमध्ये बदलली आहे. टीव्हीवर भारतीय महिला टीमचे सामने आता जास्त संख्येनं पाहायला मिळत आहेत. भारतीय मुलींच्या अंडर-19 टीमनं नुकतीच वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून इतिहास घडवला आहे. त्यापाठोपाठ यावर्षी पहिल्यांदाच वूमन्स आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. महिला आयपीएल स्पर्धेचा पहिला सिझन गाजवण्यासाठी मुंबईची सायली सातघरे तयार आहे. बोरिवलीच्या सायलीनं रिझवी कॉलेजमधून बीकॉमचं शिक्षण पूर्ण केलं. सायलीनं तिच्या फास्ट बॉलिंगच्या जोरावर क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलंय. 2021 साली नागलँड विरुद्ध झालेली मॅचमध्ये सायलीनं केलेली विक्रमी कामगिरी आजही लक्षात आहेत. सायलीनं नागालँड विरुद्धच्या वन-डे मॅचमध्ये आठ ओव्हर्समध्ये फक्त 5 रन देऊन 7 विकेट्स घेण्याची जबरदस्त कामगिरी केली होती. सायलीच्या या भेदक बॉलिंगमुळे नागालँडची टीम फक्त 17 रनवरच ऑल आऊट झाली आणि मुंबईनं ती मॅच सहज जिंकली. WPL Auction 2023 : पाकिस्तानला पराभूत करणारी मुंबईकर होणार मालामाल कधी झाली सुरूवात? सायलीनं आमच्याशी बोलताना तिचा आजवरचा प्रवास उलगडला. सायलीला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. नवव्या वर्षापासून तिनं क्रिकेट खेळायला सुरूवात केली. तिच्या पालकांनीही तिला नेहमी प्रोत्साहन दिलं. बोरिवलीच्या शिवसेवा क्रिकेट क्लबमध्ये सायलीनं सरावाला सुरूवात केली. प्रफुल्ल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तिनं क्रिकेटच्या मैदानात पदार्पण केलं.
सायलीचं स्वप्न काय? सायली आजवर मुंबई अंडर 19, मुंबई अंडर 23, वेस्ट झोन, तसंच महिला सिनिअर वेस्ट झोन स्पर्धेत खेळली आहे. घरच्यांनी सुरूवातीपासूनच पाठिंबा दिल्यानं तिनं हा प्रवास पूर्ण केलाय. आगामी काळात टीम इंडियाचं प्रतिनिधत्व करण्याचं ध्येय सायलीनं बोलून दाखवलं. WPL Auction 2023 : कोण आहे मल्लिका? WPLमध्ये ऑक्शनर म्हणून काम पाहणार भारतीय महिलांच्या सिनिअर टीमला आजवर वर्ल्ड कप स्पर्धा जिंकता आलेला नाही. भारतीय टीमचं प्रतिनिधित्व करून देशाला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देण्याचं आपलं स्वप्न असल्याचं सायलीनं सांगितलं.