धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 15 फेब्रुवारी : पुढील महिन्यात होणारा महिला आयपीएल स्पर्धेची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. महिला आयपीएल स्पर्धेचा हा पहिलाच सिझन असून त्यामध्ये पाच टीम सहभागी होणार आहेत. या सिझनसाठी खेळाडूंचा लिलाव झाला असून त्यानंतर पाचही टीम तयार झाल्या आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स ही सर्वात यशस्वी टीम आहे. या टीममध्ये मुंबईच्या एका ऑलराऊंडरचा समावेश झाला आहे. हुमायरा काझी असं या मुंबईकर खेळाडूचं नाव आहे. आयपीएलसाठी निवड झाल्यानंतर तिनं पहिली प्रतिक्रिया Local18 शी बोलताना दिली आहे.
काय म्हणाली हुमायरा?
पक्की मुंबईकर असलेली हुमायरा मुंबई इंडियन्समध्ये निवड झाल्यानं खूप आनंदी झाली आहे. तिनं या सिझनमधील मुख्य फोकस बोलताना सांगितला. 'मी पाच-सहा वर्षांची असताना भावाबरोबर क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. मला आई-वडिलांनी नेहमीच पाठिंबा दिला. मुंबई इंडियन्सची सदस्य झाल्यानं मी खूप आनंदित आहे.
आमच्या टीममध्ये कॅप्टन हरमनप्रीत कौर आहे. तसंच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. मला खूप काही शिकायला मिळेल. यंदा पहिलीच महिला आयपीएल स्पर्धा आहे. या स्पर्धेत मी सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करून टीम जिंकून देणे हाच माझा उद्देश आहे,' असं हुमायरा म्हणाली.
मुंबईकर क्रिकेटपटू हुमायरा काझीनं मुंबई इंडियन्समध्ये निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.#WPL2023 #WPL #MumbaiIndians #Local18 #News18Lokmat #MarathiNews pic.twitter.com/ARV7hb4Wuw
— News18Lokmat (@News18lokmat) February 15, 2023
कशी आहे मुंबई इंडियन्स?
मुंबई इंडियन्सची महिला टीम पहिल्या सिझनसाठी सज्ज झालीय. टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौर ही टीमचा मुख्य चेहरा आहे. त्याचबरोबर यास्तिका भाटीया आणि पूजा वस्त्राकार या भारतीय टीममधील खेळाडूंनाही मुंबईनं करारबद्ध केलंय. एमिली केर आणि नेट सिव्हर या दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही करारबद्ध करण्यात यश आल्यानं मुंबईची टीम मजबूत बनली आ आहे.
पुण्याच्या देविकाने त्या सर्वांना चुकीचं ठरवलं; महिला प्रीमिअर लीगमध्ये मोठी बोली
'आमच्या टीम संतुलित असून टीममध्ये अनुभवी आणि नवोदीत खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. आम्ही टीम म्हणून चांगली कामगिरी करू असा विश्वास आहे,' अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सची बॉलिंग कोच आणि मेन्टॉर झुलन गोस्वामीनं दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Mumbai, Mumbai Indians, Women premier league 2023