मार्च 2023 मध्ये होणाऱ्या महिला प्रीमिअर लीगसाठी सोमवारी 13 फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रिया पारपडली. या लिलाव प्रक्रियेत 5 फ्रेंचायजींनी सहभाग घेतला असून यात 409 खेळाडूंचा सहभाग होता. आपला संघ मजबूत करण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. यात पुण्याच्या 26 वर्षीय देविका वैद्य हिला यूपी वारियर्सने 1.40 कोटी रुपयांना खरेदी केलं.
भारतीय महिला क्रिकेट संघात खेळणारी महिला क्रिकेटपटू देविका वैद्य ही पुण्याची असून तिचा जन्म 13 ऑगस्ट 1997 रोजी झाला. लहानपणापासून देविकाला क्रिकेट खेळण्याची आवड होती. तिच्या आई वडिलांनी तिला क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित केले.
क्रिकेटखेळात देशासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या देविकाला लहानपणी क्रिकेट अकॅडमीत प्रवेश मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. देविकाने एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, पुण्यातील एका क्रिकेट अकॅडमीममध्ये तिचे सिलेक्शन होऊनही तिला तेथील मुख्य प्रशिक्षकाने येथे मुलींना प्रवेश नाही म्हणून अकॅडमीत प्रवेश दिला नव्हता. याप्रसंगाने देविकाचे आईवडील फार दुःखी झाले होते.
2014 मध्ये वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी देविका वैद्य हिने भारतीय संघात पदार्पण केले. अष्टपैलू खेळाडू असलेल्या देविकालातिच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तर गोलंदाजीतही तिला ३० धावा देऊन एकही विकेट मिळवता आली नाही. यानंतर तब्बल 8 वर्ष देविकाला भारतीय संघा खेळण्याची संधी मिळाली नाही.
देविका गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत पुन्हा भारतीय संघात संधी देण्यात आली. देविकाने देखील या संधीच सोन करून देशासाठी उत्तम कामगिरी केली. सध्या देविका दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग आहे.
पहिल्यांदाच होणाऱ्या महिला प्रीमिअर लीगमध्ये देविका युपी वॉरिअर्सकडून खेळताना कशी कामगिरी करेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.