मुंबई, 13 फेब्रुवारी : पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही क्रिकेटमध्ये संधी आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. मार्च 2023 मध्ये होणाऱ्या या आयपीएल स्पर्धेसाठी आज सोमवारी 13 फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रिया पारपडणार आहे. मुंबईत होणाऱ्या या लिलावात तब्बल 409 महिला खेळाडूंचा सहभाग असून महिला प्रीमियर लीगचा पहिलाच लिलाव असल्याने याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. आज होणाऱ्या या हायव्होल्टेज लिलावात आशिया खंडातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्तींची लढत पहायला मिळणार आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी आपली सर्वोत्तम टीम तयार करण्यासाठी आज लिलावात अदानी ग्रुप आणि अंबानी ग्रुप यांच्यात लढत होणार आहे. अदानी स्पोर्ट्सलाइनने महिला प्रीमियर लीगसाठी गुजरात जायंट्सची फ्रँचायझी विकत घेण्यासाठी तब्बल 1289 कोटी खर्च केले होते. त्यामुळे गुजरात जायंट्स ही आयपीएलमधली सर्वात महागडी फ्रँचायझी ठरली. हे ही वाचा : Women’s IPL Auction : स्मृती, हरमनप्रीत सोबतच या भारतीय खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघाची मालकी असलेल्या मुकेश अंबानींच्या रिलायन्सने देखील 912.99 कोटी खर्च करून महिला प्रीमिअर लीगसाठी मुंबई संघाची फ्रँचायझी विकत घेतली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएलमधील दुसरा सर्वात महागडा संघ आहे. आज होणाऱ्या महिला प्रीमिअर लीगच्या ऑक्शनमध्ये मुकेश अंबानी ग्रुप आणि अदानी ग्रुप यांच्यात चांगले खेळाडू खरेदी करण्यासाठी चुरस पहायला मिळणार आहे. आज होणाऱ्या महिला प्रीमिअर लीगच्या लिलावात 409 महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे. महिलांच्या आयपीएल लिलावात सर्वोच्च बेस किंमत ही 50 लाख रुपये आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना याशिवाय आणखी 8 भारतीय खेळाडूंचा या बेस किंमतींच्या यादीत समावेश आहे. 50 लाखांच्या मूळ किमतीत एकूण 24 खेळाडूंचा समावेश असून या खेळाडूंना लिलावात खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघ आग्रही असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.