मुंबई, 13 फेब्रुवारी : पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही क्रिकेटमध्ये संधी आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. 2023 मध्ये होणाऱ्या या आयपीएल स्पर्धेसाठी आज सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रिया पारपडणार आहे. मुंबईत होणाऱ्या या लिलावात तब्बल 409 महिला खेळाडूंचा सहभाग असून महिला प्रीमियर लीगचा पहिलाच लिलाव असल्याने याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. मुंबईत होणाऱ्या या लिलावाला दुपारी 2:30 वाजता सुरुवात होणार असून याचे थेट प्रक्षेपण वायकॉम १८ आणि जिओ टीव्हीवर होणार आहे. आज होणाऱ्या लिलाव प्रक्रियेत 5 फ्रँचाइजींना सहभाग असणार असून प्रत्येक फ्रँचाइजी प्रत्येकी 18 खेळाडूंना लिलावात खरेदी करू शकते. याचाच अर्थ लिलावात 409 पैकी 90 खेळाडुंचा लिलाव होईल. महिला आयपीएल स्पर्धा ही 4 ते 26 मार्च पर्यंत खेळवली जाईल. हे ही वाचा : पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूवर सूर्याचा इफेक्ट, त्या शॉटचा Video Viral महिलांच्या आयपीएल लिलावात सर्वोच्च बेस किंमत ही 50 लाख रुपये आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना याशिवाय आणखी 8 भारतीय खेळाडूंचा या बेस किंमतींच्या यादीत समावेश आहे. 50 लाखांच्या मूळ किमतीत एकूण 24 खेळाडूंचा समावेश असून या खेळाडूंना लिलावात खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघ आग्रही असेल. भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्ये हरमनप्रीत आणि स्मृती सोबतच भारताच्या अंडर 19 संघाची कर्णधार शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ती शर्मा इत्यादी खेळाडूंची बेस प्राईज 50 लाख रुपये आहे. शफाली वर्मा हिने काहीच दिवसांपूर्वी भारताला अंडर 19 टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तेव्हा तिला आपल्या संघात सामील करण्यासाठी फ्रँचाइजी आधिकाधिक बोली लावण्याची शक्यता आहे.
भारताची फलंदाज जेमिमा रोड्रिग्स हिने भारत पाक सामन्यात अर्धशतकीय खेळी करून संघाला विजयच्या उंबरठ्यावर पोहोचवले. तेव्हा चांगल्या फॉर्मात असलेल्या जेमिमावर ही मोठ्या रक्कमेची बोली लावली जाऊ शकते. तसेच दीप्ती शर्माने देखील वेळोवेळी आपल्या गोलंदाजीने भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी केली आहे. तेव्हा तिला देखील आपल्या संघात सामील करण्यासाठी फ्रँचाइजी मोठी बोली लावतील. हे ही वाचा : IND VS AUS : तिसऱ्या कसोटी सामन्याचे ठिकाण बदलले! आता धर्मशाला ऐवजी याठिकाणी होणार सामना भारतीय खेळाडूं सोबतच विदेशी महिला क्रिकेटपटुंचाही या लिलावावर वरचस्मा राहण्याची शक्यता आहे. यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग महिला, ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटपटू एलिस पेरी, न्यूझीलंडची अमेलिया केर, इंग्लंडची गोलंदाज नताली सीवर ब्रंट, ऑस्ट्रेलियाची तहलिया मॅक्ग्रा यांचा समावेश असून या खेळाडूही कोटींच्या कोटी उड्डाण घेण्याची शक्यता आहे.