नवी दिल्ली, 20 एप्रिल: युक्रेन आणि रशियातील (Russia Ukraine War) संघर्ष शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. रशियानं युक्रेनवर आक्रमण करून आता जवळपास दोन महिने झाले आहेत. या दरम्यान रशियानं युक्रेनमधील मारियुपोल आणि कीव यासारख्या महत्त्वाच्या शहरांवर जोरदार हल्ले केले आहेत. रशियाच्या या आक्रमक धोरणामुळे अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. तरीदेखील रशिया माघार घेण्यास तयार नाही. रशियाच्या या आक्रमकपणाची किंमत तेथील टेनिसपटूंना मोजावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियन टेनिसपटूंना या वर्षी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत (Wimbledon) खेळण्यास परवानगी दिली जाणार नाही, असं वृत्त स्पोर्ट्स इंडस्ट्री न्यूज साइट स्पोर्टिकोनं दिलं आहे. या वृत्तामध्ये तथ्य असल्यास जागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डॅनियल मेदवेदेवसह (Daniil Medvedev) अनेक रशियन खेळाडू ग्रँड स्लॅममध्ये एकही मॅच न खेळताच बाहेर पडतील. स्पोर्टिकोनं मंगळवारी (20 एप्रिल 2022) दिलेल्या बातमीनुसार, ग्रासकोर्ट ग्रँड स्लॅमचा आयोजक असलेला ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब (AELTC), रशिया (Russia) आणि बेलारूसमधील (Belarus) खेळाडूंच्या सहभागाबाबत ब्रिटिश सरकारशी (British Government) बोलणी करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीपासून ही चर्चा सुरू आहे, असं क्लबनं सांगितलं आहे. 27 जून ते 10 जुलै 22 यादरम्यान विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. त्यापूर्वीच, साधारण मे महिन्याच्या मध्यात बेलारूसच्या खेळाडूंच्या सहभागाबाबतचा निर्णय जाहीर करण्याचा विचार सुरू असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. स्पोर्टिकोच्या वृत्ताबाबत प्रतिक्रिया देण्याची विनंती करूनही एईएलटीसीनं (All England Lawn Tennis & Croquet Club) अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. आमचा दबाव वाढवू नका, रबाडानं पंजाबच्या टीमला दिला घरचा आहेर रशियन खेळाडूंवर बंदी घातल्यानं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मेदवेदेव आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या आंद्रे रुबलेव्ह (Andrey Rublev) यांना पुरुषांच्या ड्रॉमध्ये सहभागी होता येणार नाही. तर, महिलांच्या क्रमवारीत 15व्या स्थानावर असलेल्या अनास्तासिया पावल्युचेन्कोवालाही (Anastasia Pavlyuchenkova) स्पर्धेत उतरता येणार नाही. रशियन टेनिस खेळाडूंसोबत बेलारूसच्या (Belarus) खेळाडूंवरही बंदी घातली जाईल की नाही हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालं नसल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. रशियानं आपल्या स्पेशल ऑपरेशनच्या (Special Operation) नावाखाली केलेल्या आक्रमणासाठी बेलारूसचा स्टेजिंग एरिया म्हणून वापर केलेला आहे. दरम्यान, ब्रिटनचे क्रीडा मंत्री (British Sports Minister) निगेल हडलस्टन (Nigel Huddleston) यांनी गेल्या महिन्यातच सांगितलं होतं की, ‘रशियन खेळाडूनं ब्रिटनमध्ये रशियन ध्वज फडकवणं आणि लंडनमध्ये विम्बल्डन जिंकणं, या गोष्टींना त्यांचा अजिबात पाठिंबा नाही.’ त्यामुळे ब्रिटनमध्ये आयोजित होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेमध्ये रशियन आणि बेलारूसच्या खेळाडूंना निगेल यांचा कडवा विरोध असणार हे नक्की आहे. युक्रेनवरील आक्रमणानंतर टेनिस नियामक मंडळांनी रशिया आणि बेलारूसला आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धांमध्ये (International Team Competitions) सहभाग घेण्यासही बंदी घातलेली आहे. असं असलं तरी खेळाडूंना वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास परवानगी आहे. मात्र, त्यासाठी त्यांना त्यांच्या देशांचं नाव किंवा ध्वजाचा वापर करता येणार नाही. त्यांना तटस्थ राहून खेळावं लागेल. डॉमिनिक थिएम आपल्या कामगिरीबाबत समाधानी दरम्यान, यूएस ओपन टेनिस स्पर्धा 2020 चा विजेता ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिएमचा (Dominic Thiem) ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने (John Millman) मंगळवारी सर्बिया ओपन टेनिस स्पर्धेत झालेल्या सामन्यात पराभव केला. थिएमचा हा गेल्या 10 महिन्यांतला पहिला टूर लेव्हल सामना होता. त्यामुळे या सामन्यातील खेळाबाबत आपण समाधानी आहोत, असं थिएमने म्हटलं आहे. 2020 यूएस ओपन (US Open) विजेता, दोनदा फ्रेंच ओपन (French Open) आणि एकदा ऑस्ट्रेलियन ओपनचा (Australian Open) उपविजेता ठरलेल्या 28 वर्षीय डॉमिनिकनं बेलग्रेडमधील (Belgrade) एटीपी 250 इव्हेंटमध्ये अडीच तास झुंज दिली. मात्र, त्याला 3-6, 6-3, 4-6 असा पराभव पत्करावा लागला. गेल्या जूनमध्ये मॅलोर्का ओपनमध्ये (Mallorca Open) उजव्या मनगटाला झालेल्या दुखापतीनंतर डॉमिनिक बराच काळ टेनिस कोर्टपासून दूर होता. कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळेदेखील त्याचा बराच वेळ वाया गेला होता. कधीकाळी तिसऱ्या क्रमांकावर असलेला डॉमिनिक सध्या रँकिंगमध्ये 54व्या स्थानी घसरला आहे. त्याने गेल्या महिन्यात मार्बेला येथील चॅलेंजर टूर स्पर्धेत पुन्हा कोर्टवर पाऊल ठेवलं होतं. तिथे त्याला सरळ सेटमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या पुनरागमनाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, ’ मला चांगलं वाटलं. मी खरोखर आनंदी आहे. कारण बेलग्रेडमधील मॅच एखाद्या लढ्याप्रमाणं होती. मी माझ्या हालचाली आणि डिफेन्स टेक्निकबाबत खूश आहे. बॅकहॅन्ड शॉट्स चांगले होते. फोरहॅन्ड शॉट्समध्ये म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही. सतत सराव केल्यास ती अडचणही दूर होईल.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.