मुंबई, 18 मे : टीम इंडिया पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी (Team India) रवाना होणार आहे. जवळपास 4 महिने भारतीय खेळाडू तिकडेच राहतील. पहिले भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होईल, यानंतर भारत आणि इंग्लंड (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळतील. या दौऱ्याआधी खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर त्याला इंग्लंडला जाता येणार नाही, हे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये होणार आहे. विराट कोहली त्याच्या नेतृत्वात पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याच्या वडिलांनी कोरोना व्हायरसपासून मुलाचा बचाव व्हावा, म्हणून मोठं पाऊल उचललं आहे.
वॉशिंग्टन सुंदरचे वडील आयकर विभागात प्रशासकीय अधिकारी आहेत. नोकरीमुळे सुंदरच्या वडिलांना आठवड्यातून तीनवेळा कामावर जावं लागतं. चेन्नईत कोरोना रुग्णांची संख्या बघता त्यांनी घरी न येण्याचा निर्णय घेतला आहे. वॉशिंग्टन सुंदरचे वडील सध्या दुसऱ्या घरात राहत आहेत. कुटुंबासोबत ते ऑनलाईन संपर्कात आहेत.
'जेव्हापासून वॉशिंग्टन आयपीएलनंतर घरी परतला, तेव्हापासून माझी बायको आणि मुलगी त्याच्यासोबत राहत आहे, कारण ते घरातून बाहेर पडत नाहीत. मी त्याला फक्त व्हिडिओ कॉलवर पाहतो. माझ्यामुळे त्याला कोरोना संक्रमण होऊ नये,' असं एम सुंदर म्हणाले.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय पुरुष आणि महिला टीम चार्टर्ड विमानाने रवाना होतील. महिला टीम इंग्लंडमध्ये टेस्ट, वनडे आणि टी-20 सीरिज खेळेल. दोन्ही टीम 2 जूनला रवाना होतील. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबाला घेऊन जाता येईल का? याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सध्या तरी कुटुंबाला घेऊन जायला परवानगी देण्यात आलेली नाही.
एम सुंदर वॉशिंग्टन सुंदरचे प्रशिक्षकही आहेत. वॉशिंग्टन सुंदरला कायमच इंग्लंडमध्ये टेस्ट खेळण्याची इच्छा आहे. हा दौरा त्याच्या करियरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. लॉर्ड्स आणि इंग्लंडच्या दुसऱ्या मैदानांवर खेळायचं त्याचं स्वप्न आहे, असं त्याचे वडील म्हणाले. 2018 सालीही सुंदर इंग्लंड दौऱ्याच्या वनडे आणि टी-20 टीममध्ये होता, पण दुखापतीमुळे त्याला एकही मॅच खेळायची संधी मिळाली नव्हती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Team india, Washington sunder