मुंबई, 25 मे : बीसीसीआयने (BCCI) एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची (VVS Laxman) टीम इंडियाच्या आयर्लंड (India vs Ireland) दौऱ्यासाठी मुख्य कोच म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय क्रिकेट टीम आयर्लंडविरुद्ध डबलिनमध्ये 2 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. 26 जून आणि 28 जूनला दोन मॅच होणार आहेत. या कालावधीमध्ये राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे लक्ष्मणला ही जबाबदारी सोपावण्यात आली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी लक्ष्मण टीम इंडियासोबत डबलिनला कोच म्हणून जाईल, हे स्पष्ट केलं आहे. मागच्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविडला कार्यवाहक कोच बनवण्यात आलं होतं, तेव्हा रवी शास्त्री टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर होते. शिखर धवन श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाचा कोच होता. भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्धची 5 टी-20 मॅचची सीरिज संपल्यानंतर आयर्लंडला जाणार आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. भारताने आयर्लंडविरुद्ध आतापर्यंत 3 टी-20 मॅच खेळल्या आहेत, यातल्या तिन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. दोन्ही टीममध्ये पहिला सामना 2009 साली ट्रेन्ट ब्रीजमध्ये झाला, तेव्हा भारताचा 8 विकेटने विजय झाला. यानंतर डबलिनमध्येच दोन वेळा दोन्ही टीम समोरासमोर होत्या, यातली पहिली मॅच भारताने 76 रननी आणि दुसरी 143 रननी जिंकली. इंग्लंडमध्ये सराव सामना टीम इंडिया बर्मिंघममध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचआधी 24 ते 27 जून दरम्यान लिसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. राहुल द्रविड टीमसोबत 15 किंवा 16 जूनला टीम इंडियासोबत इंग्लंडला रवाना होईल. 5 जुलैपासून भारत-इंग्लंड यांच्यातली टेस्ट सुरू होईल. मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात कोरोनामुळे पाचवी टेस्ट स्थगित करण्यात आली होती, हीच टेस्ट आता खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. लक्ष्मणकडे कोचिंगचा अनुभव व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या एनसीएचा प्रमुख आहे. मागच्या वर्षी राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यानंतर लक्ष्मणला एनसीएची जबाबदारी देण्यात आली. लक्ष्मणकडे कोचिंगचाही अनुभव आहे. आयपीएलमध्ये तो सनरायजर्स हैदराबादच्या कोचिंग स्टाफचा भाग होता. याशिवाय त्याने रणजी ट्रॉफीमध्ये बंगालचा बॅटिंग सल्लागार म्हणूनही काम केलं. यावर्षाच्या सुरूवातीला अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये लक्ष्मण टीम इंडियासोबत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.