मुंबई, 16 जुलै : विराट कोहलीला मागच्या काही काळापासून मैदानामध्ये संघर्ष करावा लागत आहे. मागच्या अडीच वर्षांपासून विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटमधून शतक आलेलं नाही. इंग्लंड दौऱ्यातल्या 5 इनिंगमध्ये तर विराटला एकदाही 20 रनच्या पुढे जाता आलेलं नाही, त्यामुळे विराटला टीममधून बाहेर करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यातच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) विराटच्या पाठीशी उभा राहिला आहे. बाबर आझमने ट्विट करून विराट कोहलीला पाठिंबा दर्शवला आहे. बाबर आझमचं कोहलीला पाठिंबा देणं योग्य असल्याचं मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) मांडलं आहे. ‘क्रिकेट असो किंवा अन्य खेळ, हे दोघांचे संबंध आणखी चांगले करतो. खेळाडू यामध्ये चांगलं काम करू शकतात आणि यातले बरेच असं करत आहेत. बाबरने अविश्वसनीय संदेश दिला आहे. विराटची यावर प्रतिक्रिया आली का नाही, ते मला माहिती नाही, पण विराटने यावर आतापर्यंत उत्तर द्यायला पाहिजे होतं. बाबरच्या ट्विटवर विराटचा रिप्लाय आला तर ही खूप मोठी गोष्ट असेल, पण मला वाटत नाही, असं काही होईल,’ असं आफ्रिदी समा न्यूजसोबत बोलताना म्हणाला. विराटसाठी ट्विट केल्यानंतर बाबर आझमने यावर प्रतिक्रियाही दिली. विराटला खराब काळातून बाहेर येण्यासाठी सगळ्यांच्या समर्थनाची गरज आहे. खराब फॉर्ममध्ये असताना खेळाडूला काय वाटतं, हे मला माहिती आहे. यावेळी त्याला सपोर्ट करण्याची गरज आहे, असं बाबर आझम म्हणाला. दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरनेही कोहलीचं समर्थन केलं आहे. पाकिस्तानचा दिग्गज स्पिनर मुश्ताक अहमदच्या मते मात्र कोहलीला विश्रांती घेण्याची गरज आहे. ब्रेक घेतल्यामुळे विराट मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या तयार होऊ शकतो, असं मुश्ताक अहमद म्हणाला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप आहे, त्याआधी विराटचा फॉर्म टीमसाठी चिंतेचा विषय आहे. विराटपेक्षा टीमचे युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत, त्यामुळे विराटऐवजी युवा खेळाडूंना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.