दिल्ली, 19 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतला दुसरा सामना भारताने ६ गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत २-० ने आघाडी मिळवली आहे. तर कसोटी रँकिंगमध्येही भारत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने ३१ तर विराट कोहलीने २० धावांची खेळी केली. दोन्ही खेळाडूंना या सामन्यात मोठी खेळी साकारता आली नाही. मात्र दोघांच्याही नावावर त्यांच्या कसोटी कारकिर्दीत न घडलेल्या रेकॉर्डची नोंद झाली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या सत्रात ९ विकेट घेत गुंडाळलं. यानंतर भारतासमोर ११५ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. दरम्यान, तो दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत रोहित शर्मा एकदाही धावबाद झाला नव्हता. पहिल्यांदाच तो अशा पद्धतीने बाद झाला. हेही वाचा : IND vs AUS : पहिल्या वनडेत पांड्याकडे कर्णधारपद, 2 कसोटी सामन्यांसाठीही संघ जाहीर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या डावात टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. विराट कोहली त्याच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत कधीच यष्टीचित झाला नव्हता. मात्र या सामन्यात तो यष्टीचित झाला आणि त्याच्या नावावरही पहिल्यांद यष्टिचित होण्याची नोंद झाली.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २६३ धावा केल्या होत्या. त्यानतंर पहिल्या डावात भारतीय संघ २६२ धावाच करू शकला. पहिल्या डावात फक्त एका धावेची आघाडी घेऊन दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला ११३ धावाच करता आल्या. यानंतर ११५ धावांचे आव्हान भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.