Home /News /sport /

'विराट'पर्वाचा अस्त! या वादग्रस्त निर्णयांमुळे कोहलीला सोडावी लागली कॅप्टन्सी?

'विराट'पर्वाचा अस्त! या वादग्रस्त निर्णयांमुळे कोहलीला सोडावी लागली कॅप्टन्सी?

विराट कोहलीने भारताच्या टेस्ट टीमची कॅप्टन्सी (Virat Quits Captaincy) सोडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये (India vs South Africa) 2-1 ने पराभव झाल्यानंतर 24 तासांच्या आत विराट कोहलीने टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीवरून पायउतार व्हायचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 जानेवारी : विराट कोहलीने भारताच्या टेस्ट टीमची कॅप्टन्सी (Virat Quits Captaincy) सोडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये (India vs South Africa) 2-1 ने पराभव झाल्यानंतर 24 तासांच्या आत विराट कोहलीने टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीवरून पायउतार व्हायचा निर्णय घेतला आहे. विराटने आधीच टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली, यानंतर त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवण्यात आलं. आता टेस्ट टीमची कॅप्टन्सीही सोडल्यामुळे विराट कोणत्याही फॉरमॅटचा कॅप्टन उरला नाही. भारतीय क्रिकेटमधून आता विराट पर्वाचा अस्त झाला आहे. विराटच्या नेतृत्वात भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला, तर वनडे वर्ल्ड कपची सेमी फायनल भारताने गमावली. टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-12 स्टेजमध्येच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. विराट कोहली भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असला तरी त्याच्या नेतृत्वात काही वादग्रस्त निर्णय घेतले गेले. जोहान्सबर्ग टेस्टमधून माघार नुकत्याच संपलेल्या जोहान्सबर्ग टेस्टमधून विराट कोहलीने माघार घेतली, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला. जोहान्सबर्ग टेस्टच्या आदल्या दिवशी विराट नेटमध्ये सराव करत होता, पण मॅचच्या दिवशी पाठीला दुखापत झाल्यामुळे तो मैदानात उतरला नाही. विराटच्या अनुपस्थितीवरून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले. विराट जोहान्सबर्ग टेस्ट खेळला असता तर केपटाऊनमधली त्याची टेस्ट 100 वी असती, पण विराटने माघार घेतल्यामुळे आता श्रीलंकेविरुद्ध बँगलोरमध्ये होणारी टेस्ट त्याची 100 वी असेल. विराट आणि बँगलोरचं आरसीबीमुळे असलेलं जिव्हाळ्याचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे विराटने बँगलोरमध्ये 100 वी टेस्ट खेळण्यासाठी जोहान्सबर्ग टेस्टमधून माघार घेतल्याचा आरोप केला गेला. सेंच्युरियन टेस्टमध्ये विजय मिळाल्यानंतर भारताचा आत्मविश्वास दुणावला होता, पण जोहान्सबर्गमधून विराटने माघार घेणं भारतासाठी मोठा धक्का ठरला. या टेस्टमध्ये टीम इंडियाचा फक्त पराभवच झाला नाही तर दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास बळावला आणि त्यांनी तिसरी टेस्टही खिशात टाकली. भारताचं दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. पुजारा-रहाणेवर विश्वास विराट कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही खेळाडूंवर फॉर्ममध्ये नसतानाही विश्वास ठेवला. दक्षिण आफ्रिकेमध्ये मधल्या फळीकडून मोठ्या स्कोअरची अपेक्षा असतानाही पुजारा-रहाणे अपयशी ठरले. ज्यामुळे टीम इंडियाला टेस्ट सीरिज जिंकण्यात अपयश आलं. इंग्लंड दौरा अर्धवट सोडला 2021 मधल्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय टीम 2-1 ने आघाडी मिळवली, पण यानंतर कोरोनामुळे भारताने पाचवी टेस्ट न खेळण्याचा निर्णय घेतला. युएईमध्ये आयपीएल खेळायला जाण्यासाठी भारताने पाचवी टेस्ट न खेळण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप इंग्लंडच्या काही माजी क्रिकेटपटूंनी केला. टी-20 वर्ल्ड कपआधीच सोडली कॅप्टन्सी टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच विराटने आपण स्पर्धेनंतर या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं. विराटच्या या निर्णयावर बीसीसीआय आणि निवड समितीही नाराज झाल्याचं बोललं गेलं. विराटने वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेआधी असा निर्णय घेऊन टीमचं लक्ष विचलित केल्याची टीकाही त्याच्यावर झाली. रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) ईशान किशन केएल राहुलसोबत ओपनिंगला बॅटिंगसाठी आला. हे दोघं बॅटिंगसाठी मैदानात येत असल्याचं बघून कॉमेंट्री करत असलेल्या मुरली कार्तिक आणि सायमन डूल यांनीही आश्चर्य व्यक्त केलं. विराट कोहलीचा हा निर्णय टीम इंडियाला चांगलाच महागात पडला. कारण इशान किशन मॅचच्या 17 व्या बॉलला 4 रन करून आऊट झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 4 शतकं आहेत. ही चारही शतकं रोहितने ओपनिंगला खेळून केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. एवढं शानदार रेकॉर्ड असतानाही विराटने ही रणनिती का अवलंबली, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (2o17 Champions Trophy Final) ही विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची पहिलीच टेस्ट होती. पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) या हाय व्होल्टेज सामन्यात विराटने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. एवढा मोठा तणाव असलेल्या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा विराटचा हा निर्णय अनेकांना रुचला नाही. या सामन्यात पाकिस्तानने 338 रनचा मोठा स्कोअर उभारला. मोठ्या स्कोअरच्या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या दबावात भारताचा फक्त 158 रनने ऑल आऊट झाला आणि पाकिस्तानने हा सामना 180 रनने जिंकला. अनिल कुंबळेसोबत वाद याच सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यात वाद झाले, अखेर अनिल कुंबळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाले. 2019 वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकाचा गोंधळ 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमी फायनलपर्यंत मजल मारली, पण संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये भारताला चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनमुळे अडचणीचा सामना करावा लागला. वर्ल्ड कपच्या बराच काळ आधीपासूनच ही समस्या समोर दिसत असली तरी त्यावर कोणताही मार्ग काढण्यात आला नाही. अंबाती रायुडूऐवजी विजय शंकर 2019 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीमवरूनही बराच वाद पाहायला मिळाला. वर्ल्ड कपआधी बराच काळ अंबाती रायुडू (Ambati Rayudu) टीम इंडियामध्ये होता, पण वर्ल्ड कपच्या टीममध्ये रायुडूची निवड झाली नाही. रायुडूऐवजी विजय शंकर (Vijay Shankar) याला टीममध्ये संधी देण्यात आली. यानंतर रायुडूने नाराजी व्यक्त करत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वर्ल्ड कपमध्ये विजय शंकर काही मॅच खेळला, पण दुखापतीनंतर तो वर्ल्ड कपमधून बाहेर झाला. यानंतर त्याचं भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं नाही. वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होण्यासारखी विजय शंकरची प्रतिभा होती, तर मग तो त्यानंतर पुन्हा भारतीय टीममध्ये का दिसला नाही? एवढच नाही तर आयपीएलमध्ये हैदराबादची टीमही त्याला सगळ्या मॅच खेळवत नाही. मग टीम इंडियाला विजय शंकरमध्ये नक्की कोणती प्रतिभा दिसली, असा प्रश्नही उपस्थित होतो. स्पिनर जोडीवरून यू-टर्न 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने आर.अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना टीमबाहेर केलं, पण आता पुन्हा एकदा टीमची भूमिका 360 डिग्रीमध्ये बदलली आहे. अश्विन आणि जडेजाला बाहेर केल्यानंतर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना टीममध्ये घेण्यात आलं. या दोघांनी पुढच्या दोन वर्षांमध्ये भारताला अनेक विजय मिळवून दिले, पण आता परत टीमने जडेजा आणि अश्विनवर विश्वास दाखवला आहे. अश्विनचं 4 वर्षांनंतर भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये पुनरागमन झालं. अश्विन बेंचवरच टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विनची टीममध्ये निवड करण्यात आली. 5 वर्षांनंतर अश्विनने भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन केलं, पण पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अश्विनला खेळवण्यात आलं नाही. इंग्लंड दौऱ्यातही टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनला चारही टेस्टमध्ये बेंचवरच बसावं लागलं, यावरूनही विराटच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धोनी सातव्या क्रमांकावर 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एमएस धोनीला सातव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं. धोनीआधी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या बॅटिंगला उतरले. टीम इंडिया तणावात असताना एमएस धोनीसारखा शांत खेळाडू वरच्या क्रमांकावर खेळणं गरजेचं होतं. तसंच करियरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या धोनीला मैदानात सेट व्हायला देखील वेळ लागत होता हेदेखील दिसून आलं होतं. तरीदेखील सेमी फायनलमध्ये धोनी सातव्या क्रमांकावर खेळला. या सामन्यात धोनीने 69.44 च्या स्ट्राईक रेटने 72 बॉलमध्ये 50 रन केले. भारताचा या सामन्यात 18 रनने पराभव झाला आणि वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. लॉर्ड्स टेस्टमध्ये कुलदीपला खेळवणं 2018 साली इंग्लंड दौऱ्यातल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये ढगाळ वातावरण आणि हिरवी खेळपट्टी असतानाही विराट कोहलीने स्पिनर असलेल्या कुलदीप यादवला 11 खेळाडूंमध्ये स्थान दिलं. इंग्लंड दौऱ्यात पुजाराला डच्चू 2018 सालच्याच इंग्लंड दौऱ्यातल्या एका टेस्टमध्ये विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराला टीमबाहेर बसवलं होतं. टेस्ट स्पेशलिस्ट असलेल्या पुजाराला टेस्ट टीममधूनच काढल्यानंतर विराटवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india, Virat kohli

    पुढील बातम्या