Home /News /sport /

2 वर्षांमध्ये 6 चुका, विराटकडून रोहितकडे कॅप्टन्सी देण्यामागची Inside Story

2 वर्षांमध्ये 6 चुका, विराटकडून रोहितकडे कॅप्टन्सी देण्यामागची Inside Story

टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) वनडे आणि टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडेल, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

    मुंबई, 13 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) वनडे आणि टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडेल, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. टी-20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताच्या मर्यादित ओव्हरचा कॅप्टन होईल, पण विराटकडे टेस्ट टीमचं नेतृत्व कायम राहिल. याबाबत टीम मॅनेजमेंट, विराट कोहली, रोहित शर्मा आणि बीसीसीआय यांच्यात चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे. भारताने विराटच्या नेतृत्वात टेस्ट क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली असली, तरी वनडे आणि टी-20 मध्ये मात्र टीमची कामगिरी निराशाजनक झाली. विराटने मोठ्या आयसीसी ट्रॉफीदरम्यान केलेल्या घोडचुकाही अनेकवेळा दिसून आल्या. यातल्याच काहींमुळे विराटच्या कॅप्टन्सीवर अनेकदा टीकाही झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग 2017 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (2o17 Champions Trophy Final) ही विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची पहिलीच टेस्ट होती. पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) या हाय व्होल्टेज सामन्यात विराटने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. एवढा मोठा तणाव असलेल्या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा विराटचा हा निर्णय अनेकांना रुचला नाही. या सामन्यात पाकिस्तानने 338 रनचा मोठा स्कोअर उभारला. मोठ्या स्कोअरच्या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या दबावात भारताचा फक्त 158 रनने ऑल आऊट झाला आणि पाकिस्तानने हा सामना 180 रनने जिंकला. अनिल कुंबळेसोबत वाद याच सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यात वाद झाले, अखेर अनिल कुंबळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाले. 2019 वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकाचा गोंधळ 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमी फायनलपर्यंत मजल मारली, पण संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये भारताला चौथ्या क्रमांकाच्या बॅट्समनमुळे अडचणीचा सामना करावा लागला. वर्ल्ड कपच्या बराच काळ आधीपासूनच ही समस्या समोर दिसत असली तरी त्यावर कोणताही मार्ग काढण्यात आला नाही. अंबाती रायुडूऐवजी विजय शंकर 2019 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीमवरूनही बराच वाद पाहायला मिळाला. वर्ल्ड कपआधी बराच काळ अंबाती रायुडू (Ambati Rayudu) टीम इंडियामध्ये होता, पण वर्ल्ड कपच्या टीममध्ये रायुडूची निवड झाली नाही. रायुडूऐवजी विजय शंकर (Vijay Shankar) याला टीममध्ये संधी देण्यात आली. यानंतर रायुडूने नाराजी व्यक्त करत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. वर्ल्ड कपमध्ये विजय शंकर काही मॅच खेळला, पण दुखापतीनंतर तो वर्ल्ड कपमधून बाहेर झाला. यानंतर त्याचं भारतीय टीममध्ये पुनरागमन झालं नाही. वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होण्यासारखी विजय शंकरची प्रतिभा होती, तर मग तो त्यानंतर पुन्हा भारतीय टीममध्ये का दिसला नाही? एवढच नाही तर आयपीएलमध्ये हैदराबादची टीमही त्याला सगळ्या मॅच खेळवत नाही. मग टीम इंडियाला विजय शंकरमध्ये नक्की कोणती प्रतिभा दिसली, असा प्रश्नही उपस्थित होतो. स्पिनर जोडीवरून यू-टर्न 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने आर.अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना टीमबाहेर केलं, पण आता पुन्हा एकदा टीमची भूमिका 360 डिग्रीमध्ये बदलली आहे. अश्विन आणि जडेजाला बाहेर केल्यानंतर कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना टीममध्ये घेण्यात आलं. या दोघांनी पुढच्या दोन वर्षांमध्ये भारताला अनेक विजय मिळवून दिले, पण आता परत टीमने जडेजा आणि अश्विनवर विश्वास दाखवला आहे. अश्विनचं 4 वर्षांनंतर भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये पुनरागमन झालं आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अश्विन खेळणार आहे. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धोनी सातव्या क्रमांकावर 2019 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एमएस धोनीला सातव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं. धोनीआधी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या बॅटिंगला उतरले. टीम इंडिया तणावात असताना एमएस धोनीसारखा शांत खेळाडू वरच्या क्रमांकावर खेळणं गरजेचं होतं. तसंच करियरच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या धोनीला मैदानात सेट व्हायला देखील वेळ लागत होता हेदेखील दिसून आलं होतं. तरीदेखील सेमी फायनलमध्ये धोनी सातव्या क्रमांकावर खेळला. या सामन्यात धोनीने 69.44 च्या स्ट्राईक रेटने 72 बॉलमध्ये 50 रन केले. भारताचा या सामन्यात 18 रनने पराभव झाला आणि वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. 2017 ते 2019 या दोन वर्षांमध्ये मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये झालेल्या या मोठ्या चुका टीम इंडियासाठी मात्र नक्कीच महागात पडल्या. आता या तीन वर्षांमध्ये आयसीसीचे तीन वर्ल्ड कप आहेत. 2021 आणि 2022 साली दोन टी-20 वर्ल्ड कप आणि 2023 साली 50 ओव्हरचा वर्ल्ड कप होणार आहे, या स्पर्धांमध्ये अशा चुका टाळण्याचं आणि भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकवून देण्याचं आव्हान टीम इंडिया आणि कॅप्टनवर अवलंबून असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, T20 world cup, Virat kohli

    पुढील बातम्या