मुंबई, 16 नोव्हेंबर : आयपीएल 2022 (IPL 2022) चा मोसम भारतामध्येच खेळवण्याचा बीसीसीआयचा (BCCI) मानस असल्याचं बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आधीच सांगितलं आहे. कोरोना व्हायरसमुळे मागच्या दोन्ही आयपीएल युएईमध्ये खेळवल्या गेल्या, तसंच यंदाचा टी-20 वर्ल्ड कपही तिकडेच झाला. आता 2022 ची आयपीएल भारतातच व्हावी, यासाठी बीसीसीआयने प्रयत्न सुरू केले आहेत. एवढच नाही तर आयपीएल 2022 चे सामने ठाण्यात होणार का? असा प्रश्न उपस्थित व्हायचं कारण म्हणजे, विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) पाच मॅच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर (Dadoji Konddev Stadium Thane) होणार आहेत. ६ आणि ७ डिसेंबर रोजी या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार असून ८, ९, ११, १२ आणि १४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत. विजय हजारे ट्रॉफीचे सामने म्हणजे आयपीएलची रंगीत तालीम तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयपीएलच्या दृष्टीने पाऊल?
आयपीएल 2021 चं आयोजन सुरुवातीला भारतात करण्यात आलं होतं. पहिल्या राऊंडचे सामने झाल्यानंतर आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, ज्यामुळे स्पर्धा मे महिन्यात स्थगित करावी लागली. यानंतर दुसरा राऊंड सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये खेळवला गेला. आयपीएलच्या सुरुवातीला बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही, पण जेव्हा टीम दुसऱ्या ठिकाणी सामने खेळण्यासाठी विमानाने प्रवास करू लागल्या तेव्हा कोरोनाचा बायो-बबलमध्ये शिरकाव झाला होता.
आयपीएल 2021 वेळी झालेली चूक दुरुस्त करत बीसीसीआय पुढच्या मोसमात विमान प्रवास टाळू शकते. यासाठी जवळपासची स्टेडियम असणं गरजेचं आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईचं डी.वाय.पाटील स्टेडियम, ठाण्याचं दादोजी कोंडदेव आणि पुण्याचं स्टेडियम ही पाच स्टेडियम उपलब्ध आहेत. या पाच ठिकाणी आयपीएलचे सामने झाले तर सगळ्या टीमना विमानाने प्रवास करण्याची गरज नाही, त्यामुळे बायो-बबल मॅनेज करणं आणि कोरोनाचं शिरकाव रोखणंही सोपं जाऊ शकतं.
आयपीएलच्या पुढच्या मोसमात 10 टीम
आयपीएलच्या पुढच्या मोसमात 10 टीम सहभागी होणार आहेत. मागच्या महिन्यात झालेल्या टेंडर प्रक्रियेमधून लखनऊ आणि अहमदाबादच्या टीमचा आयपीएलमध्ये समावेश झाला, त्यामुळे आता मॅचची संख्याही वाढणार आहे. आयपीएल 2022 आधी खेळाडूंचं मेगा ऑक्शनही होणार आहे. यासाठीच्या नियमांचीही घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या सध्याच्या 8 टीमना जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवावे लागणार आहेत, तर नव्या दोन टीमना लिलावाआधी 3 खेळाडू थेट घेता येणार आहेत.
35 वर्षांनी ठाण्यात क्रिकेटचे सामने
तब्बल 35 वर्षांनंतर ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये बीसीसीआयची मोठी स्पर्धा रंगणार आहे. याआधी 1986 साली रणजी करंडक सामने झाले होते. त्यानंतर काही कारणास्तव या स्टेडिअमवर स्पर्धात्मक क्रिकेट सामने होऊ शकले नव्हते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Ipl 2022, Vijay hazare trophy