नवी दिल्ली, 26 मार्च : देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून केंद्र सरकारने 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. यानंतरही लोक घरातून बाहेर फिरताना दिसत आहेत. अशा लोकांना समजावण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. आता उत्तर प्रदेश पोलिसांनी धोनीच्या एका फोटोचा वापर करून लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील धावबाद झालेल्या फोटोचा वापर उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे की, आपल्याला कोरोनाला पराभूत करायचं आहे आणि तेसुद्धा आत राहून.
वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाच्या आशा धोनी मैदानात असेपर्यंत होत्या. धोनी धावबाद झाला आणि भारताने तिथंच वर्ल्ड कप गमावला अशी भावना निर्माण झाली होती. धोनी बाद झाल्यानंतर सामन्याचं चित्र पालटलं होतं. तो बाद झाला यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. तसंच जड पावलांनी मैदान सोडणाऱ्या धोनीला पाहणंही चाहत्यांना कठीण जात होतं.

कोरोनापासून वाचायचं असेल तर घरात सुरक्षित राहणं हाच उपाय आहे. त्यामुळं नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जगभरात अनेक देशांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळंच भारतात लॉकडाउन केल्यानंतरही घराबाहेर पडणाऱ्यांना समजावून सांगण्यासाठी पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे.
हे वाचा : Coronavirus : भारतीय क्रिकेटपटूंना जमलं नाही ते फेडररनं करून दाखवलं
जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 20 हजार लोकांचा जीव गेला आहे. तर जवळपास 3 लाख लोकांना याची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात 600 पेक्षा जास्त लोकांना कोरोना झाला आहे.

याआधी भारताचा फिरकीपटू आर अश्विनच्या मांकडिंगचा फोटोही लोकांनी शेअर करत घरातच थांबा असं आवाहन केलं होतं. अश्विननं आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना जोस बटलरला मांकडिंग पद्धतीनं धावबाद केलं होतं. त्याच्या फोटोला शेअर करताना म्हटलं आहे की, एक वर्षापुर्वी असंच धावबाद झाला होता. आता देशात लॉकडाउन सुरू आहे आणि आठवण करून देण्यासाठी हा उत्तम फोटो आहे. अश्विनने म्हटलं की बाहेर फिरू नका, घराच्या आतच सुरक्षित रहा.
हे वाचा : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा क्रिकेटपटू मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.