मुंबई, 3 सप्टेंबर**:** आयपीएलमध्ये असे काही संघ आहेत ज्यांनी अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी पटकावलेली नाही. गेल्या 15 मोसमात मुंबईनं सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर चेन्नईनं चार वेळा, कोलकाता नाईट रायडर्सन आणि हैदराबादनं दोनदा तर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सनं प्रत्येकी एक वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. पण दिल्ली, बंगलोर, पंजाब अशा अव्वल संघांच्या नशिबी अद्यापही आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याची संधी आलेली नाही. पण आगामी आयपीएलसाठी बरेट संघ आतापासूनच स्पर्धेच्या तयारीसाठी लागले आहेत. त्यातलाच एक संघ आहे पंजाब किंग्स. पंजाबचा आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध पूर्ण झाला आहे. 2019 साली इंग्लंडला वन डे विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक आता पंजाबच्या ताफ्यात सामील होणार आहेत. ट्रेवर बेलिस होणार पंजाबचे नवे कोच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर ट्रेवर बेलिस हे पंजाबचे नवे प्रशिक्षक असणार आहेत. लवकरच ते अधिकृतरित्या पंजाबच्या प्रशिक्षकपदासाठीचा करार करतील अशी माहिती आहे. बेलिस पंजाबचे माजी प्रशिक्षक आणि भारतीय संघाचा महान लेग स्पिनर अनिल कुंबळेची जागा घेतील. गेल्या तीन आयपीएल मोसमात पंजाब संघाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. इतकच नव्हे तर कुंबळे यांच्या कार्यकाळात संघाला एकदाही प्ले ऑफमध्ये धडक मारता आली नाही. त्यामुळे पंजाब किंग्सनं अनिल कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला. ‘लकी कोच’ बेलिस आयपीएलमध्येही बेलिस यांनी 2012 ते 2014 अशी तीन वर्ष प्रशिक्षकपद सांभाळलं होतं. या तीन वर्षात त्यांनी तब्बल दोन वेळा कोलकात्याला विजेतेपद मिळवून दिलं. 2012 आणि 2014 साली कोलकात्याचा संघ गौतम गंभीरच्या नेतृत्वात विजेता ठरला होता. त्यानंतर 2015 साली ते इंग्लंड संघाचे प्रशिक्षक बनले. पुढच्या चार वर्षात त्यांनी इंग्लंडचा सर्वोत्तम संघ तयार केला. आणि वन डे विश्वचषकाच्या इतिहासात 2019 साली बेलिस यांचा हा संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला. त्यामुळे कोलकाता आणि इंग्लंडला विजतेपद मिळवून देणारे बेलिस पंजाबसाठीही लकी ठरतील अशी अपेक्षा आहे. हेही वाचा - Asia Cup 2022: रवींद्र जाडेजा टी20 वर्ल्ड कपलाही मुकणार? जाडेजाबाबत मोठी बातमी समोर
15 सीझनमध्ये एकच फायनल
पंजाब किंग्स संघ आजवर केवळ एकदाच आयपीएलची फायनल गाठू शकला. 2014 साली पंजाबनं जॉर्ज बेलीच्या नेतृत्वात फायनलमध्ये धडक मारली होती. पण गौतम गंभीरच्या कोलकात्यानं पंजाबचं विजेतेपदाचं स्वप्न धुळीला मिळवलं होतं. पण आता नेस वाडिया, प्रिती झिंटा आणि सहमालकांच्या पंजाब किंग्सला इंग्लंडचे ट्रेवर बेलिस हे नवे प्रशिक्षक पहिलंवहिलं विजेतेपद मिळवून देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.