टोकियो, 23 एप्रिल: ऑलिम्पिक सुरू होण्याला अद्याप तीन महिने आहेत. मात्र, त्यापूर्वी जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक (Coronavirus spike) पहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जापानची राजधानी टोकियो (Tokyo)सह इतर तीन शहरांत शुक्रवारी आणीबाणी (virus emergency) जाहीर करण्यात आली आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी टोकियोसह ओसाका, क्योटा आणि ह्योगो येथे 25 एप्रिल पासून ते 11 मेपर्यंत आणीबाणी जाहीर केली आहे.
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी म्हटलं की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यापर्यंत 'गोल्डन वीक'च्या सुट्ट्या सुरू होत आहेत. या सुट्ट्यांमध्ये नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरायला जातात. त्यामुळे नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जपानमधील काही भागांत आणीबाणी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक तज्ञ आणि नेत्यांनी म्हटलं की, सरकारकडून सुरू असलेले हे आपत्कालीन उपाय अपुरे पडत आहेत. त्यामुळे त्वरित पावले उचलण्याची आवश्यकता आहे. जपानमध्ये आतापर्यंत जवळपास 5 लाख कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 10,000 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी जपानने संपूर्ण देशभरात अद्याप लॉकडाऊन जाहीर केलेला नाहीये.
वाचा: R-Surakshaa : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Reliance स्वतःच राबवणार कोरोना लसीकरण मोहीम
23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. ऑलिम्पिकचे आयोजन हे यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. त्यापूर्वी कोरोनाचा संसर्ग वाढला असून टोकियोसह काही शहरांत आणीबाणी लागू केली आहे त्यामुळे ऑलिम्पिकवर कोरोनाचं सावट आलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकपूर्वी मशाल रिले काढण्यात आली. या रिलेत बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या संदर्भात ऑलिम्पिक आयोजकांनी सांगितले की, गेल्या महिन्यात सुरू झालेली ऑलिम्पिक मशाल रिलेत कोरोना संक्रमणाचं पहिलं प्रकरण आलं आहे. एका 30 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Japan