मुंबई, 30 जुलै : सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोमने (MC Mary Com) टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) आपल्या फ्लायवेट (51 किलो) प्री क्वार्टर फायनल मॅचवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गुरुवारी मॅच सुरू व्हायच्या काही मिनिटं आधी मला ड्रेस बदलायला सांगण्यात आला, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. याआधी मेरीकोमने ऑलिम्पिकमधल्या खराब निर्णयांसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) बॉक्सिंग समितीला जबाबदार धरलं होतं. मेरीकोमने तीनपैकी दोन राऊंड जिंकल्यानंतरही तिला पराभवाचा सामना करावा लागला होता.
शुक्रवारी मेरीकोमने ट्वीटकरून या सगळ्या वादाला वाचा फोडली. 'हे धक्कादायक आहे, रिंगचा ड्रेस काय असेल, याचं कोणी स्पष्टीकरण देऊ शकेल का? मला प्री-क्वार्टरचा बाऊट सुरू व्हायच्या एक मिनीट आधी रिंग ड्रेस बदलायला सांगण्यात आलं. कोणी समजवून सांगेल का?' असा प्रश्न मेरीकोमने विचारला. मेरीकोम या सामन्यात नाव नसलेली जर्सी घालून रिंगमध्ये उतरली. मुकाबला सुरु व्हायच्या आधी मेरीकोमला जर्सी बदलायला सांगण्यात आलं, कारण जर्सीवर तिचं नाव लिहिण्यात आलं होतं. जर्सीवर स्वत:चं फक्त पहिलंच नाव असायला पाहिजे, असं तिला आयोजकांनी सांगितलं.
'मी रिंगच्या आतमध्येही खूश होते, बाहेर आले तेव्हाही आनंदी होते, कारण आपला विजय झाला आहे, हेच माझ्या डोक्यात होतं. मला जेव्हा डोपिंगसाठी नेण्यात आलं, तेव्हाही मी खूश होते. मी सोशल मीडियावर बघितलं आणि जेव्हा माझे प्रशिक्षक छोटे लाल यादव यांनी मला सांगितलं तेव्हा मला आपण हरलो आहे, हे कळालं. मी या बॉक्सरला दोनवेळा हरवलं आहे. रेफरीने तिचा हात उंचवाला, यावर माझा विश्वासही बसला नाही. शपथेवर सांगते, मला पराभव झालाय, असं वाटलंही नाही. मला एवढा विश्वास होता,' असं वक्तव्य मेरी कोमने केलं.
'या निर्णयाची समिक्षा किंवा विरोध करू शकत नाही, ही सगळ्यात खराब गोष्ट आहे. जगाने हे पाहिलं, त्यांनी जे केलं ते जरा जास्तच होतं. मला दुसऱ्या राऊंडमध्ये सर्वसंमत्तीने जिंकायला पाहिजे होतं. मग हा निर्णय 3-2 कसा? एक मिनीट किंवा एका सेकंदात खेळाडूचं सगळं काही निघून जातं, जे झालं ते दुर्दैवी आहे, मी जजच्या निर्णयामुळे निराश आहे,' असं मेरीकोम म्हणाली.
'माझं मानसिकदृष्ट्या शोषण करण्यात आलं. मॅचच्या पहिल्या राऊंडपासून ते अंतिम राऊंडपर्यंत मी खूप पंच मारले, पण माझ्याबाबतीत असं का केलं गेलं, हे माहिती नाही. तू हरू कशी शकतेस? असा प्रश्नही माझ्या मुलाने मला विचारला. या निर्णयानंतर मी रात्रभर झोपू शकले नाही, मला जेवणही जात नाही,' असं मेरीकोमने सांगितलं.
'मी अजूनही खेळणार आहे, पण 2024 ऑलिम्पिकमध्ये वयाची अट असल्यामुळे मला भाग घेता येणार नाही. मेडल मिळालं नाही, त्यामुळे मी देशाची माफी मागते. मला देशाने खूप प्रेम दिलं आणि भविष्यातही असंचं प्रेम मिळण्याची आशा आहे,' अशी भावुक प्रतिक्रिया मेरीकोमने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021