सेंच्युरियन, 30 डिसेंबर : टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्याची धमाकेदार सुरूवात केली आहे. टीमने पहिल्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 113 रननी पराभव केला आहे. मॅचच्या अखेरच्या दिवशी 305 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा 191 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताने तीन मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याची संधी आहे. कोच म्हणून राहुल द्रविडचा (Rahul Dravid) हा पहिलाच परदेश दौरा आहे, त्यामुळे तोदेखील इतिहास घडवण्यासाठी इच्छूक असेल.
टीम इंडियाने यावर्षी दक्षिण आफ्रिकेशिवाय ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही टेस्ट जिंकली आहे. टीमने फक्त दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. याआधी 2018 सालीही भारताने अशीच कामगिरी केली होती. तेव्हा टीमला ऑस्ट्रेलियात 2 टेस्ट आणि दक्षिण आफ्रिका-इंग्लंडमध्ये प्रत्येकी 1-1 टेस्ट जिंकता आली होती. 2021 साली भारताने ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेत 1-1 टेस्ट जिंकली, तर इंग्लंडमध्ये 2 टेस्ट विजय मिळवले. 2021 साली पहिल्यांदाच टीम इंडिया ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकण्यात आणि इंग्लंड-दक्षिण आफ्रिकेत आघाडी घेण्यात यशस्वी राहिली. 2018 साली भारताला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज गमवावी लागली होती, त्यामुळे 2021 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी 89 वर्षातलं सर्वोत्तम राहिलं.
ब्रिस्बेन ते सेंच्युरियनचा प्रवास
भारतीय टीमने ऑस्ट्रेलियात जानेवारी महिन्यात टेस्ट सीरिज जिंकली होती. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात झालेल्या सामन्यात भारताचा 3 विकेटने विजय झाला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 369 रन केल्यानंतर भारताने 336 रन केले होते. ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या इनिंगमध्ये 294 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे भारताला 328 रनचं आव्हान मिळालं. ऋषभ पंतच्या नाबाद 89 रनच्या जोरावर भारताने हे आव्हान 7 विकेट गमावून पार केलं. यानंतर इंग्लंड दौऱ्यात ऑगस्ट महिन्यामध्ये लॉर्ड्सवर भारताचा 151 रननी आणि ओव्हलवर 157 रननी विजय झाला. आता सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेलाही हरवलं आहे.
कोहली 2 टेस्ट जिंकणारा पहिला कर्णधार
विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियात दोन टेस्ट जिंकणारा भारताचा पहिला कर्णधार आहे. त्याने माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याला मागे टाकलं आहे. या दोघांनी कर्णधार असताना दक्षिण आफ्रिकेत एक-एक टेस्ट मॅच जिंकली होती. कोहलीचा दक्षिण आफ्रिकेतला हा 4 मॅचमधला दुसरा विजय आहे. धोनीने 5 टेस्टमध्ये एक तर द्रविडने 3 टेस्टमध्ये एक विजय मिळवला. याशिवाय कर्णधार म्हणून अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट जिंकू शकले नाहीत. पहिल्या टेस्टमध्ये भारताच्या फास्ट बॉलरचाच दबदबा राहिला, कारण 20 पैकी 18 विकेट त्यांनी घेतल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या विकेट घेण्यात अश्विनला यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South africa, Team india, Virat kohli