नवी दिल्ली, 2 जानेवारी: वर्षाच्या अखेरीस ऑफ स्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh ) यानं ट्विट करत क्रिकेटमधून संन्यास घेतल्याची माहिती दिली. निवृत्ती नंतर भज्जी मनातल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्याने संघातील खेळाडू आणि बीसीसीआयवर (BCCI)नाराजी दर्शवली आहे. आताही त्याने बीसीसीआयवर निशाणा साधत कॅप्टन्सी न मिळण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका न्यूज चॅनेलशी संवाद साधताना भज्जीने क्रिकेट कारकीर्द, वाद आणि कर्णधारपदाशी निगडीत गोष्टींवर भाष्य केले आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद न मिळण्यासंदर्भात भज्जीला विचारले असता तो म्हणाला, मला कर्णधार पदाची जबाबदारी कशी मिळवायचे हे माहिती नव्हते किंवा मी त्या पात्रतेचा नसेन. असे खोचक व्यक्तव्य त्याने यावेळी केले. तसेच, बीसीसीआयमध्ये उच्च पदावर असणारा आणि कर्णधारपदासाठी मला पाठिंबा देऊ शकेल असा पंजाबमधील कोणताच व्यक्ती नव्हता. तसे असते तर कदाचित मला टीम इंडियाचे कर्णधारपदही मिळाले असते. मला ही जबाबदारी मिळाली असती तर मी माझे सर्वोत्तम दिले असते. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून मी माझ्या सर्व कर्णधारांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. माझ्याकडे बीसीसीआयमध्ये असे पदाधिकारी नव्हते जे मला कर्णधारपदासाठी पाठिंबा देऊ शकतील. त्यामुळेच मला संधी मिळाली नाही. अशी भावना भज्जीने यावेळी व्यक्त केली.
गांगुली माझ्यासाठी सर्वोत्तम कर्णधार
तुम्ही कधी कर्णधारांसोबत खेळलात का? त्यापैकी सर्वोत्तम कर्णधार कोण होता असे तुम्हाला वाटते? असे सवाल भज्जीला उपस्थित केले असता. तो म्हणाला, सौरव गांगुली माझ्यासाठी सर्वोत्तम कर्णधार होता. जेव्हा मी संघाबाहेर होतो तेव्हा त्याने मला निवडले. 2001 च्या ऑस्ट्रेलिया मालिकेत मला संधी मिळाली. मी मालिकेत 32 विकेट घेतल्या आणि कसोटी हॅट्ट्रिक घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरलो. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी कर्णधार झाला, त्यानंतर त्याने संघाची धुराही चांगल्या प्रकारे सांभाळली. धोनीने 2011 पर्यंत संघाचे नेतृत्व केले. भारत जगज्जेताही झाला. मात्र, मला गांगुलीचे कर्णधारपद सर्वात जास्त आवडते. कारण गोलंदाज म्हणून त्याने मला पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच मी चांगला गोलंदाज झालो.
कर्णधार झालो असतो तर…
जर कर्णधार असतास तर 2020 पर्यंत खेळला असतास का? यावर तो म्हणाला, नाही मी इतका वेळ खेळलो नसतो. तसे असते तर मी 2015-16 मध्येच क्रिकेटला अलविदा केले असते. माझी इच्छा होती की, मी 2015-16 पर्यंत खेळू आणि टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या 500 विकेट पूर्ण करु. आणि त्यानंतर निवृत्ती. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. पण जे घडले ते चांगल्यासाठी झाले. या प्रवासामध्ये चांगले वाईट याची ओळख पटली.